खाण घोटाळाही रडारवर
By admin | Published: August 23, 2015 01:59 AM2015-08-23T01:59:05+5:302015-08-23T01:59:44+5:30
पणजी : जैका-लुईस बर्जर लाच प्रकरणात बडे राजकीय नेते कचाट्यात सापडले असतानाच आता खनिज घोटाळ्यात अडकलेल्या मोठ्या राजकीय प्रस्थांनाही
पणजी : जैका-लुईस बर्जर लाच प्रकरणात बडे राजकीय नेते कचाट्यात सापडले असतानाच आता खनिज घोटाळ्यात अडकलेल्या मोठ्या राजकीय प्रस्थांनाही चौकशीसाठी समन्स बजावण्यात येणार असल्याची माहिती विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) सूत्रांकडून देण्यात आली. खनिज घोटाळा प्रकरणात माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे, विश्वजित राणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल हेदे, अनिल साळगावकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून चौकशी करण्यात आली होती, तर एका प्रकरणात दिगंबर कामत यांना याआधीच समन्स बजावण्यात आले होते. दरम्यान, अनिल साळगावकर व ज्योकिम आलेमाव यांना शनिवारी एसआयटीने समन्स बजावले.
खनिज घोटाळा प्रकरणाच्या तपास कामाने वेग घेतला असून या प्रकरणात अडकलेल्या बड्या राजकीय नेत्यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात येणार आहेत. त्यापैकी काही जणांना अटकही होण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस मुख्यालयातील सूत्रांकडून देण्यात आली. त्यामुळे येत्या काही दिवसांत महत्त्वपूर्ण घडामोडी होण्याची शक्यता आहे. एसआयटीचे प्रमुख असलेले पोलीस उपमहानिरीक्षक कमलाकांत व्यास यांना याविषयी विचारले असता, त्यांनी या वृत्ताला पुष्टी दिली. ते म्हणाले की, खानिज घोटाळ्यातील तपासाने वेग घेतला असून या प्रकरणाशी संबंध असलेल्यांना समन्स बजावून चौकशी करणे, हा तपासाचाच भाग आहे. राणे पिता-पुत्र, प्रफुल्ल हेदे यांनाही समन्स बजावले जाणार आहे काय, या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी, पोलीस गरज भासल्यास कुणालाही व केव्हाही समन्स बजावू शकतात, असे सांगितले.
(प्रतिनिधी)