खनिज खाणप्रश्नी तोडगा निघेल, धीर धरावा - विनय सहस्रबुद्धे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 08:00 PM2019-02-20T20:00:22+5:302019-02-20T20:00:52+5:30
गोव्यातील खनिज खाणींचा प्रश्न हा केंद्र सरकारसमोर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर विषय पोहचलेला आहे. न्यायसंस्थेशी तो विषय निगडीत असल्याने तोडगा निघण्यास विलंब झाला.
पणजी - गोव्यातील खनिज खाणींचा प्रश्न हा केंद्र सरकारसमोर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर विषय पोहचलेला आहे. न्यायसंस्थेशी तो विषय निगडीत असल्याने तोडगा निघण्यास विलंब झाला. थोडा जास्त धीर धरण्याची गरज आहे. कदाचित लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीही प्रश्न सुटू शकतो, असा आम्हाला विश्वास वाटत असल्याचे भाजपचे केंद्रीय नेते व राज्यसभा खासदार विनय सह बुद्धे यांनी बुधवारी येथे सांगितले.
भाजपच्या निवडणूक जाहिरनाम्याच्या कामासाठी लोकांच्या सूचना व अपेक्षा गोळा करण्याची मोहीम पक्ष राबवत आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून सह बुद्धे गोव्यात आले आहेत. त्यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, गोमंतकीयांनी त्यांच्या अपेक्षा आम्हाला कळावाव्यात. भाजपचे रथ सगळीकडे फिरत असून रथासोबत पेटय़ा आहेत. त्या पेटीत लोकांनी सूचना किंवा अपेक्षा लिहून टाकावी. ती भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयात पंतप्रधानांर्पयत पोहचेल. त्यानुसार भाजपचा जाहिरनामा तयार होईल. जर गोव्याला खास दर्जा मिळावा अशी अपेक्षा असेल तर तशीही अपेक्षा लिहून पाठवावी, म्हणजे त्यावर विचार करून जाहिरनाम्यात त्याचा समावेश करता येईल.
सह बुद्धे म्हणाले, की गोव्यातील खनिज खाणींचा प्रश्न हा पंतप्रधानांनी विचारात घेतलेला आहे. गोवा सरकार व केंद्र सरकार दोन्ही एकमेकांच्या समन्वयाने हा प्रश्न सुटावा व खाणी परत सुरू व्हाव्यात म्हणून प्रयत्नशील आहेत. केंद्र आता काही करणार नाही असे गोव्यातील एका मंत्र्याने म्हटलेले असेल तर मला त्याची काही कल्पना नाही. शेवटी खनिज खाणींचा विषय हा न्यायप्रविष्ट असल्याने तो क्लिष्ट बनला. केवळ केंद्र किंवा राज्य सरकारच्याच ते हातात असते तर एव्हाना तोडगा निघाला असता. या विषयात न्यायसंस्थेचा सहभाग गुंतलेला आहे हे लक्षात घ्यावे लागते. आज ना उद्या तोडगा हा निघेलच. थोडी सहनशीलता ठेवूया.
दरम्यान, केंद्रात पुन्हा मोदी सरकार अधिकारावर येईल. कारण गेली साडेचार वर्षे बरेच काम विद्यमान सरकारने केले आहे, असे सह बुद्धे म्हणाले. यावेळी विनय तेंडुलकर, नरेंद्र सावईकर, सदानंद शेट तानावडे व दामू नाईक उपस्थित होते.