हा मिनी वर्ल्डकपच - निकोलए अॅडम
By admin | Published: October 4, 2016 07:31 PM2016-10-04T19:31:41+5:302016-10-04T19:31:41+5:30
देशातील आघाडीच्या पाच देशांचा समावेश असलेली ‘ब्रिक्स’ स्पर्धा म्हणजे मिनी वर्ल्डकपच. १७ वर्षांखालील विश्वचषकासाठी या स्पर्धेतील प्रत्येक सामना महत्त्वाचा असून आम्ही
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 04 - देशातील आघाडीच्या पाच देशांचा समावेश असलेली ‘ब्रिक्स’ स्पर्धा म्हणजे मिनी वर्ल्डकपच. १७ वर्षांखालील विश्वचषकासाठी या स्पर्धेतील प्रत्येक सामना महत्त्वाचा असून आम्ही रशियाविरुद्ध सकारात्मक सुरुवात करण्याचा प्रयत्न करू, असे भारताचे प्रशिक्षक निकोलए अॅडम यांनी सामन्यापूवी सांगितले. हा सामना बांबोळी येथील मैदानावर होईल. उद्घाटनीय सामना ब्राझील आणि चीन यांच्यात होईल. स्पर्धेत पाचही संघ आज गोव्यात पोहचतील.
अॅडम म्हणाले, काही खेळाडूंच्या किरकोळ दुखापती सोडल्या तर संपूर्ण संघ मजबूत आहे. अनिकेत जाधव दुखापतग्रस्त होता तो सुद्धा आता ‘फिट’ आहे. रशिया हा मजबूज संघ आहे. त्यांनी क्वालिफाइंग अभियान ९ गुणांसह पूर्ण केले होते. या संघाचा आम्ही आदर करतो. त्यांच्याविरुद्ध खेळणे आव्हानात्मक असेल. यामुळे आम्हाला बारकाव्यांवर नजर ठेवावी लागेल. ही स्पर्धा खेळाडूंच्या अनुभवासाठी महत्त्वाची आहे. खेळाडूंनी आपल्या खेळात सुधारणा केल्या असून १६ वर्षांखालील एएफसी चषकातही चांगले प्रदर्शन केले आहे. मात्र, भारतीय संघाला स्पर्धेत अंतिम फेरी गाठता आली नव्हती.
एएफसीला पत्र
भारतीय संघ बोरीस थंगजामशिवाय मैदानात उतरेल. त्याला एएफसी स्पर्धेत इराणविरुद्धच्या सामन्यात दुसरे पिवळे कार्ड दाखविण्यात आले होते. पिवळे कार्ड दाखवल्याबद्दल प्रशिक्षक अॅडम यांनी नाराजी व्यक्त केली. एएफसीसारख्या मोठ्या स्पर्धेत उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून मोठ्या अपेक्षा असतात. पंचांच्या या निर्णयावर आपण एएफसीला पत्र पाठविले आहे. त्यांच्या या निर्णयाचे आपणास दु:ख झाल्याचेही अॅडम यांनी सांगितले.
दुसरीकडे, भारताचा कर्णधार सुरेश सिंह म्हणाला की, जेव्हापासून निकोलए अॅडम संघाचे प्रशिक्षक झाले तेव्हापासून खूप बदल झालेला नाही. त्यांच्याकडून खूप शिकायला मिळाले. फुटबॉलमधील बारकाव्यांचा त्यांना मोठा अभ्यास आहे. प्रत्येक खेळाडूवर लक्ष असते. आम्ही स्पर्धेत चांगले प्रदर्शन करू, असा विश्वास आहे.
विश्वचषकाची तयारी जोरात : दमित्री
विश्वचषकापूर्वी भारतात १७ वर्षांखालील स्पर्धा खेळण्याची संधी मिळत आहे. हा अनुभव आमच्या संघासाठी महत्त्वपूर्ण असेल. स्पर्धेत दिग्गज संघ आहेत. आम्ही सुद्धा आगामी विश्वचषक पुढे ठेवून तयारी करीत आहोत. गेल्या दोन वर्षांपासून हा संघ एकत्र आहे. संघातील खेळाडूंचा चांगला अभ्यास झाला असून त्यांच्यात ताळमेळही उत्तम आहे. भारताविरुद्ध विजयासाठी आम्ही सुरुवात करण्याचा प्रयत्न करणार, असे रशियाचा प्रशिक्षक दमित्री उलयानोव्ह याने सांगितले.
दरम्यान, या स्पर्धेत ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका संघांचा समावेश आहे.