गोव्यातील खाण अवलंबितांकडून पंतप्रधानांना लक्ष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 11:50 AM2018-12-28T11:50:35+5:302018-12-28T11:59:30+5:30
गोव्याचा खनिज खाण उद्योग सुरू करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणतीही पाऊले उचलत नाहीत अशी गोव्यातील हजारो खनिज खाण अवलंबितांची भावना बनली आहे. यामुळे खाण अवलंबित आणि त्यांचे नेते केंद्र सरकारविरुद्ध सक्रिय झाले आहेत.
पणजी : गोव्याचा खनिज खाण उद्योग सुरू करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणतीही पाऊले उचलत नाहीत अशी गोव्यातील हजारो खनिज खाण अवलंबितांची भावना बनली आहे. यामुळे खाण अवलंबित आणि त्यांचे नेते केंद्र सरकारविरुद्ध सक्रिय झाले आहेत. पंतप्रधान मोदी हे येत्या महिन्यात गोव्यातील तिसऱ्या मांडवी पुलाचे उद्घाटन करण्यासाठी गोव्यात येण्याची शक्यता आहे. त्यावेळी पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवायचा असे खाण अवलंबितांनी ठरविले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानंतर खनिज खाण धंदा बंद झाला. काही लाख लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार खनिज खाण धंद्यामुळे प्राप्त होतो. शिवाय गोवा सरकारच्या तिजोरीत वार्षिक एक हजार कोटींचा महसुल जमा होतो. खाण बंदीनंतर हे सगळे बंद झाले. गोव्यातील खाण व्यवसाय नव्याने सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय खनिज खाण व विकास कायद्यात दुरुस्ती करावी अशी मागणी गोव्यातील खाण अवलंबितांनी सातत्याने केली. गोव्यातील पर्रीकर सरकारनेही तशीच भूमिका घेतली व केंद्रीय खाण मंत्रलयाला त्याविषयी पत्र लिहिले. मात्र केंद्र सरकारने या पत्राची दखल घेतलेली नाही. केंद्र सरकार कायदा दुरुस्ती आणू पाहत नाही याची कल्पना गोव्यातील खाण व्यवसायिकांना व खाण अवलंबितांना आली आहे. गेल्या पंधरवडय़ात गोव्यातील खाण अवलंबितांनी दिल्लीत जाऊन तीन दिवस धरणे आंदोलन केले होते. त्यावेळी कुणीही केंद्रीय मंत्री आंदोलकांसमोर आला नाही. यामुळे गोव्यातील खासदारांवरही खाण अवलंबित नाराज आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपाला धडा शिकविण्याची भाषाही खाण अवलंबित करत आहेत.
दरम्यान, गोव्यात मांडवी नदीवर मोठा पूल साकारला आहे. या पुलाच्या उद्घाटनासाठी गोवा सरकार पंतप्रधानांना निमंत्रित करणार आहे. त्यावेळी पंतप्रधानांना काळे झेंडे दाखविले जातील, असे आंदोलकांचे नेते पुती गावकर व इतरांनी जाहीर केले आहे.