खाण घोटाळा प्रकरण : मेलवानीच्या कार्यालयाची एसआयटीकडून झडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 02:47 PM2018-09-11T14:47:01+5:302018-09-11T14:55:10+5:30
बेकायदेशीर खाण प्रकरणात विशेष तपास पथकाने (एसआयटी) नथुरमल खाण कंपनीचे मालक हरीश मेलवानी यांच्या कार्यालयाची मंगळवारी झाडाझडती घेतली.
पणजीः बेकायदेशीर खाण प्रकरणात विशेष तपास पथकाने (एसआयटी) नथुरमल खाण कंपनीचे मालक हरीश मेलवानी यांच्या कार्यालयाची मंगळवारी झाडाझडती घेतली.
खाण घोटाळा प्रकरणातील एक संशयित व एसआयटीकडून गुन्हा दाखल करण्यात आलेले हरिष मेलवानी यांच्या पणजी येथील रिझवी चेंबरमधील कार्यालयात एसआयटीने सकाळी झडती घेतली. या झडतीतून काही महत्त्वाची कागदपत्रे मिळाली असल्याची माहिती एसआयटीच्या सुत्रांकडून देण्यात आली आहे. ही झडती दुपारपर्यंत चालू होती.
एम बी शहा यांनी ज्या अनेक खाण लिजांच्या बाबतीत गैरव्यवहारांचा ठपका ठेवला होता त्यात मेलवानी यांच्या नथुरमल कंपनीचाही समावेश आहे. या प्रकरणात एसआयटीकडून गुन्हा नोंदविण्यात आल्यानंतर मेलवानी यांना चौकशीसाठी समन्सही बजावले होते. मेलवानी यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला होता. त्यांच्या अर्जावर सुनावण्या सुरू झाल्यानंतर मध्यंतरी एसआयटीकडून न्यायालयात निवेदन दिले होते की मेलवानी यांच्या अटकेची एसआयटीला त्वरित गरज नाही. तशी गरज भासल्यास त्यांना 48 तास अगोदर कळविले जाणार असल्याचेही त्यात म्हटले होते. या निवेदनानतर मेलवानी यानीही आपला अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला होता. आताही त्यांना अटक करायची असेल तर एसआयटीला 48 तासांची पूर्व नोटीस देणे आवश्यक आहे.