पदभारानंतर मंत्री अ‍ॅक्शनमध्ये...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2017 01:45 AM2017-03-22T01:45:47+5:302017-03-22T01:45:59+5:30

म्हापसा : राज्यात अनेक ठिकाणी आल्वारा भूखंड असून अशा प्रकारचे भूखंड गृहनिर्माण मंडळाच्या वतीने ताब्यात घेऊन त्यावर

Minister after action, in action ... | पदभारानंतर मंत्री अ‍ॅक्शनमध्ये...

पदभारानंतर मंत्री अ‍ॅक्शनमध्ये...

Next

म्हापसा : राज्यात अनेक ठिकाणी आल्वारा भूखंड असून अशा प्रकारचे भूखंड गृहनिर्माण मंडळाच्या वतीने ताब्यात घेऊन त्यावर वसाहती बांधण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे मत गृहनिर्माण मंत्री जयेश साळगावकर यांनी व्यक्त केले आहे.
गेली अनेक वर्षे दुर्लक्षित करण्यात आलेल्या गृहनिर्माण मंडळाला जास्तीत-जास्त महसूल प्राप्त करून देण्याचा व या मंडळातून जास्तीत-जास्त लोकांना लाभ मिळवून देण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे मंत्री जयेश साळगावकर यांनी सांगितले. मंडळाच्या कार्यक्षेत्राच्या विस्तारावर भर देताना राज्यात आल्वारा पद्धतीचे जे भूखंड आहेत ते भूखंड ताब्यात घेण्याचा प्रयत्न गृहनिर्माण मंडळाच्या वतीने करण्यात येणार असून या भूखंडाचा फायदा अनेकांना होऊ शकतो, असेही ते म्हणाले.
मंडळावर अनेक वर्षांपासून दुर्लक्ष करण्यात आले असल्याने दुर्लक्षित मंडळ म्हणून गृहनिर्माण मंडळाकडे बघितले जाते. आपल्याला या मंडळाचे महत्त्व वाढवायचे असून मंडळाच्या महसुलातही वाढ करण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याची माहिती साळगावकर यांनी दिली.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत देशातील सर्व नागरिकांना घरे उपलब्ध करून देण्याची योजना तयार केली आहे. देशतील एकही नागरिक बेघर राहणार नाही, यावर या योजनेद्वारे भर देण्यात येणार आहे. राज्याचे मंत्री या नात्याने गोव्यातील लोकांनाही या योजनेचा लाभ मिळवून देण्याचा व राज्यातही योजनेचा विस्तार करण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर विधानसभेत मांडणाऱ्या अर्थसंकल्पात गृहनिर्माणासाठी विशेष तरतूद करणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या संदर्भात आपण त्यांच्याशी विस्तारितपणे चर्चा केली असल्याची माहिती साळगावकर यांनी देत अर्थसंकल्पासाठी तरतूद करण्याचे आश्वासन आपल्याला देण्यात आल्याचे सांगितले.
गृहनिर्माण मंत्री जयेश साळगावकर यांनी आपल्या खात्याचा ताबा घेतल्यानंतर मंत्रालयात गृहनिर्माण मंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन चर्चा केली. या बैठकीत त्यांनी आपल्या मंडळाच्या कार्यपद्धतीची माहिती करून घेतली.
दरम्यान, साळगाव मतदारसंघातील आमदार या नात्याने मतदारसंघातील लोकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर आपले प्राधान्य राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. रस्त्यांचे रुंदीकरण तसेच पाण्याची सोय करून देण्यास प्राधान्य देण्यात येईल. कचरा प्रकल्पात पडून असलेल्या कचऱ्याची लवकरात-लवकर विल्हेवाट लावण्यावर आपला भर राहिल. या कचऱ्यामुळे त्या भागातील पाण्यावर परिणाम झाल्याने त्याला प्राधान्य देण्यात येणार असून मुख्यमंत्री पर्रीकरांसमवेत या प्रकल्पाला भेट दिली असता आपण त्यांचे लक्ष या प्रश्नावर वेधल्याचे साळगावकर या वेळी म्हणाले. (खास प्रतिनिधी)

Web Title: Minister after action, in action ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.