मंत्री नामधारी, त्यांना प्रश्नांचे काही पडलेले नाही; आमदार लोबो संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 11:16 AM2023-11-30T11:16:39+5:302023-11-30T11:17:56+5:30
साळगाव प्रकल्पात दक्षिणेतील कचऱ्यावर प्रक्रियेवरून संताप
लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : दक्षिण गोवा जिल्ह्यातील कचऱ्यावर विल्हेवाट लावण्यासाठी कुडचडे येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला आहे. सुमारे २०० टन क्षमतेचा हा प्रकल्प असूनही त्यात फक्त राजकीय हस्तक्षेपाने फक्त २० टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. त्यामुळेच मडगावातील कचरा साळगावात पाठवला जातो. कचऱ्याचा प्रश्न पाहिला असता राज्यातील मंत्र्यांनी नावापुरते मंत्रालय स्वीकारले आहे, अशी थेट टीका कळंगूटचे आमदार मायकल लोबो यांनी केली. दक्षिणेतील कचरा साळगावात कशासाठी? असा सवाल आमदार लोबोंनी केला.
पर्रा येथे पत्रकारांशी बोलताना आमदार लोबो म्हणाले की, 'कुडचडेतील प्रकल्पात कचराच नसल्याने त्यांना कचरा कधी येईल याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. दुसऱ्या बाजूने साळगावमधील प्रकल्पात क्षमतेपेक्षा जास्त कचरा पाठवला जातो. दक्षिणेतील कचऱ्यावर दक्षिण गोवा जिल्ह्यात तर उत्तरेतील कचऱ्यावर उत्तर गोवा जिल्ह्यातच प्रक्रिया करावी असे ठरवण्यात आले होते; पण त्याकडे दुर्लक्ष केले आहे.'
आमदार लोबो म्हणाले की, 'दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंबंधी केलेल्या उपाययोजनांबाबत दुर्लक्ष केले जात आहे. पंचायती, पालिकांकडून उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात नाही. मुरगाव, मडगाव, फोंडा तसेच इतर पालिका क्षेत्रात पडून असलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया झाली. पण नव्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याने तो साचू लागला आहे.
महामंडळाच्या दोन वर्षे बैठकाच नाहीत...
आमदार लोबो म्हणाले की, कचरा व्यवस्थापन महामंडळाची पूर्वी दर महिन्याला दोन बैठका व्हायच्या. मात्र, मागील २ वर्षे बैठक झालेल्या नाहीत. मी आमदार असूनही मला बैठकीचे निमंत्रण आलेले नाही. महामंडळात कसल्याच प्रकारच्या हालचाली होत नाहीत. त्यामुळे गोवा राज्य कचरामुक्त करण्याचे उद्दिष्ट अद्यापही अपूर्णच आहेत. कचऱ्याच्या मुद्यावर फक्त मुख्यमंत्री काम करीत आहेत. इतर मंत्री दुर्लक्ष करीत असल्याचाही आरोप मायकल लोबो यांनी केला.