सिक्वेरा यांना मंत्रिपदाची शपथ; सव्वा वर्षानंतर मिळाले पद, नीलेश काब्राल यांचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 08:20 AM2023-11-20T08:20:43+5:302023-11-20T08:22:22+5:30
सिक्वेरा यांनी इंग्रजीतून मंत्रिपदाची शपथ घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : रविवारी दिवसभर झालेल्या नाट्यमय घडामोडीत काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले आमदार आलेक्स सिक्वेरा यांना राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी मंत्रिपदाची शपथ दिली. त्यापूर्वी सकाळीच सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. सिक्वेरा यांनी इंग्रजीतून मंत्रिपदाची शपथ घेतली.
शपथविधीनंतर पत्रकारांशी बोलताना सिक्वेरा यांनी आपण आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करू असे सांगितले. त्यांच्या कुटुंबीयांसह मतदारसंघातील अनेक जण राजभवनावर आले होते. शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सभापती रमेश तवडकर, मंत्री विश्वजित राणे, माविन गुदिन्हो, सुभाष फळदेसाई, गोविंद गावडे, नीळकंठ हळर्णकर, सुभाष शिरोडकर, रोहन खंवटे, उपसभापती ज्योसुआ डिसोझा, आमदार दिगंबर कामत, मायकल लोबो, डिलायला लोबो, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, प्रेमेंद्र शेट व इतर महनीय व्यक्ती उपस्थित होते. माजी मंत्री नीलेश काब्राल मात्र या सोहळ्याला उपस्थित राहिले नाहीत. सकाळी काब्राल यांनी आपल्या सार्वजनिक बांधकाम मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना त्यांच्या साखळी येथील निवासस्थानी जाऊन दिला होता.
अन्याय झाला असे म्हणणे योग्य नाही. निष्ठावानांना डालवून पक्षाने त्यांच्यावर अन्याय केला नाही का, असे विचारले असता काब्राल म्हणाले की, 'यापूर्वी स्व. मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री असताना इतर ज्येष्ठ मंत्री असतानाही मला मंत्रिपद देण्यात आले होते. त्यावेळी इतर आमदार आपल्यावर अन्याय केल्याचे म्हणू शकले असते. त्यामुळे आता पक्षाच्या हितासाठी मला मंत्रिपद सोडण्यास सांगितले तर मी अन्याय केला, असे म्हणणे बरोबर नाही. मी पक्षाच्या कोअर टीममध्ये आहे. केंद्रीय मंत्री आपल्याशी चांगली चर्चा करतात. मुख्यमंत्र्यांसह इतर सर्वच मंत्र्यांबरोबर माझे चांगले संबंध आहेत. त्यामुळे अन्याय वगैरे केल्याचे मी म्हणणार नाही.'
पक्षाच्या विनंतीस मान देऊन काब्राल यांचा राजीनामा: मुख्यमंत्री
'मंत्री नीलेश काब्राल यांना पक्षाने तथा मी वैयक्तिक स्तरावर राजीनामा देण्याची विनंती केली होती. त्या विनंतीला मान देऊन पक्षाच्या सांगण्यावरून त्यांनी राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे. त्यांच्या जागी आमदार आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे,' असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका कार्यक्रमादरम्यान बोलताना सांगितले.
'काब्राल यांच्यावर कोणतेही आरोप नाहीत. आरोप होत असल्याने त्यांना मंत्रिमंडळातून काढण्यात आलेले नाही, हे लोकांनी समजून घ्यावे,' असे डॉ. सावंत यांनी सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले की, 'नीलेश काब्राल हे भाजपच्या कोअर कमिटीचे सदस्य आहेत. त्यामुळे पक्ष जो निर्णय घेत आहे, तो त्यांना मानावा लागेल. यापूर्वीदेखील अनेकांनी पक्षासाठी त्याग केला आहे. त्यांना पक्षाची इतर काही जबाबदारी देण्यात येणार आहे. राज्यपालांनी काब्राल यांचा राजीनामा स्वीकारला आहे. काब्राल यांच्याकडे जी जबाबदारी होती, तीच जबाबदारी सिक्वेरा यांना देण्यात येणार आहे.'
माझ्यावर दबाव नव्हता : काब्राल
दरम्यान राजीनाम्यासाठी आपल्यावर दबाव टाकल्याचा काब्राल यांनी इन्कार केला. ते म्हणाले की, मी कोणतीही गोष्ट दबावाखाली करीत नाही. दबाव टाकला असता तर राजीनामाच दिला नसता. ते म्हणाले तकी, काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या ८ आमदारांपैकी काहींना मंत्रिपदे देण्याचे आश्वासन पक्षाने दिले होते. त्यामुळे त्यांच्यासाठी मंत्रिपद रिक्त करायचे होते. मी मूळ भाजपचा आमदार असल्यामुळे पक्षाने ते काम मला सांगितले. केंद्रीय नेत्यांनी मला मंत्रिपद सोडण्यास सांगितले व ते मी पूर्ण केले. या घडामोडींचा लोकसभा निवडणुकीत पक्षाला नुकसान होणार नाही का, असे विचारले असता नुकसान होणार नाही असे त्यांनी सांगितले.
आश्वासन दिले होते म्हणून...
सिक्चेरा यांना मंत्री बनविण्याचे आश्वासन दिले होते, म्हणून त्यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले, 'त्याच कारणामुळे नीलेश काब्राल यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची विनंती केली होती. काब्राल यांच्यावर कोणतेही आरोप नाहीत. आरोप होत असल्याने त्यांना मंत्रिमंडळातून काढण्यात आलेले नाही, हे लोकांनी समजून घ्यावे.'
लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपलाच
एकेकाळी गोव्यात काँग्रेस पक्ष हा लोकांची शक्ती होती. आज भाजप लोकांची शक्ती आहे. लोकसभा निवडणुकीविषयी सांगायचे झाल्यास गोव्यातील दोन्ही जागा या भाजपच जिंकणार आहे. सर्वांना विश्वासा घेवून पुढील वाटचाल केली जाईल, असे नूतन मंत्री सिक्चेरा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
काब्राल यांना सामोरे जाणे मला कठीण
नीलेश काब्राल यांना सामोरे जाणे मला कठीण वाटेल. कारण त्यांचे मंत्रिपद मला मिळाले. माझ्यामुळे त्यांना मंत्रिपद सोडावे लागले. मंत्री म्हणून काब्राल यांनी माझ्या मतदारसंघातही कामे केली. - आलेक्स सिक्वेरा, मंत्री.
गैरसमज करून घेऊ नये
सिक्वेरा यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याच्या आश्वासनावर पक्षात घेण्यात आले होते. त्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याची वेळ आली असल्याने पक्षाने हा निर्णय घेतला. त्यामुळे कुणीही गैरसमज करून घेऊ नये. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.
विनंतीमुळे राजीनामा
मुख्यमंत्री व पक्षाच्या केंद्रीय नेत्यांच्या विनंतीमुळे राजीनामा दिला आहे. पक्षाच्या हितासाठी नेत्यांनी घेतलेला निर्णय मान्य आहे. आपल्यावर अन्याय झाला असे वाटत नाही. - नीलेश काब्राल, आमदार.