गोव्यातील खाण अवलंबितांचा मंत्री, आमदार, खासदारांवर रोष
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2018 09:22 PM2018-10-05T21:22:46+5:302018-10-05T21:26:22+5:30
खाण अवलंबितांसमोर शुक्रवारी भाजपचे मंत्री निलेश काब्राल, खासदार नरेंद्र सावईकर, श्रीपाद नाईक यांच्यासह काही भाजप आमदारांना रोषाला सामोरे जावे लागले.
पणजी : खाण अवलंबितांसमोर शुक्रवारी भाजपचे मंत्री निलेश काब्राल, खासदार नरेंद्र सावईकर, श्रीपाद नाईक यांच्यासह काही भाजप आमदारांना रोषाला सामोरे जावे लागले. अजूनही खाणप्रश्न सुटत नसल्याने अवलंबितांमध्ये अस्वस्थता व असंतोष कसा आहे ते बहुतेक लोकप्रतिनिधींना शुक्रवारी पाहता आले. काँग्रेसच्या आमदारांनीही अनुभव घेतला.
वीज मंत्री काब्राल यांना एकाने जाहीरपणे प्रश्नांच्या घे-यामध्ये घेरले. मनोहर पर्रीकर यांनी सर्वप्रथम खाणी बंद केल्या व आपण खाणी बंद केल्याचे ते अभिमानाने सांगतही होते असे खाण अवलंबित म्हणाले. यावेळी मंत्री काब्राल नाराज झाले. पर्रीकर यांनी खाणी बंद केल्या, त्या सरकारमध्ये मी देखील होतो. पण 2015 साली मग खाणी सुरू झाल्या होत्या, असे काब्राल यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. यावेळी खाण अवलंबितांनी त्यांच्यावर प्रश्नांच्या आणखी फैरी झाडल्या. काब्राल संतप्त झाले.
आमदार मायकल लोबो यांनी नरेंद्र सावईकर व श्रीपाद नाईक या दोघांचीही हजेरी घेतली. सावईकर यांनी मग भाषणच केले नाही. श्रीपाद नाईक बोलले. साखळीचे आमदार प्रमोद सावंत हेही भाषण करू शकले नाहीत. खाण अवलंबितांच्या रोषाचा अनुभव भाजपला आला. काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र आम्ही तुमच्यासोबतच आहोत व तुम्ही जर येत्या 21 रोजी गोवा बंद करत असाल तर आमचे सोळाही आमदार तुमच्यासोबत असतील असे जाहीर केले. रमाकांत खलप यांनी गोव्यातील खाणी बंद होण्यास सर्वस्वी पर्रीकर हेच जबाबदार आहेत, कारण त्यांनी पूर्ण खाण धंदाच बेकायदा असल्याची भूमिका विरोधात असताना घेतली होती असे सांगितले. खाण अवलंबितांचा रोष पाहून काही आमदार, खासदार, मंत्र्यांनी वगैरे आम्ही प्रसंगी राजीनामा देण्यास तयार आहोत, असा सूर लावला.