खाते वाटपप्रश्नी असंतोष कायम, मंत्र्यांमध्ये प्रचंड खलबते
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 08:15 PM2019-06-08T20:15:04+5:302019-06-08T20:24:23+5:30
कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांना शनिवारी पत्रकारांनी विचारले तेव्हा त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.
पणजी : मंत्र्यांना जी खाती दिली गेली आहेत, त्यावरून काही मंत्र्यांमध्ये निर्माण झालेला असंतोष शमलेला नाही. काही मंत्री गुप्तपणे खलबते करत असून त्यांच्यामध्ये दबावाची वेगळी रणनीती तयार होऊ लागली आहे.
कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांना शनिवारी पत्रकारांनी विचारले तेव्हा त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. मंत्री गावडे म्हणाले, की मुख्यमंत्र्यांनी चूक केली. त्यांनी आम्हा सर्व मंत्र्यांना बोलावून घेऊन आम्हाला कोणती खाती देणार याची पूर्वकल्पना द्यायला हवी होती. शेवटी खाती वाटपाचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा आहे पण खात्याविषयी जर त्यांनी चर्चा केली असती तर बरे झाले असते. काही मंत्र्यांमध्ये नाराजी आहे काय असे पत्रकारांनी विचारताच नाराजी असू शकते, कारण अगोदर चर्चा झाली नाही असे मंत्री गावडे म्हणाले. मला यापूर्वी जी खाती मिळाली, त्यांना मी न्याय देत आहे. आता जे सहकार खाते दिले, त्याचाही मी स्वीकार करतो.
दरम्यान, काही मंत्र्यांनी आपले नाव उघड न करण्याच्या अटीवर लोकमतला सांगितले की, अजून अतिरिक्त खाते वाटपाची अधिसूचना सही होऊन आलेली नाही. अधिसूचनेचा मसुदा तेवढा आला आहे. एकदा अधिसूचना जारी झाल्यानंतर मग आम्ही भूमिका मांडणार आहोत. मंत्री गावडे यांना शिक्षण खाते हवे होते अशी चर्चा काही मंत्र्यांमध्ये आहे. उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांना वाहतूक खाते न मिळाल्याने आजगावकरही खूप अस्वस्थ आहेत. कदाचित उद्या सोमवारी मुख्यमंत्री काही मंत्र्यांशी स्वतंत्रपणे चर्चा करू शकतात.
अधिसूचनेच्या मसुद्यात कोणताही बदल न करता अधिसूचना जारी केली जावी, असे भाजपाच्या काही मंत्र्यांचे म्हणणे आहे. भाजपाचे मंत्री त्यांना मिळालेल्या खात्यांवर खूश आहेत. मंत्री विनोद पालयेकर यांना एकही अतिरिक्त खाते मिळाले नाही व महसूल मंत्री रोहन खंवटे यांना नियोजन व सांख्यीकी हे खाते दिले गेले, याविषयीही मंत्र्यांमध्ये चर्चा सुरू आहे.