लाइनमन जांबावलीकर मृत्यू प्रकरणी वीजमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा: रमाकांत खलप
By किशोर कुबल | Published: April 19, 2024 03:53 PM2024-04-19T15:53:01+5:302024-04-19T15:54:16+5:30
१२ हजार कोटी खर्च करूनही वीजेच्या धक्क्याने ७१ माणसे, ३० जनावरे ठार.
किशोर कुबल, पणजी : लाइनमन मनोज जांबावलीकर मृत्यू प्रकरणी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी इंडिया गाडीचे उमेदवार रमाकांत खलप यांनी केली आहे
कर्तव्य बजावताना विजेचा धक्का लागून लाइनमनचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी ऐकून आपल्याला धक्का बसल्याचे खलप यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, '२०१९ ते २०२४ या काळात जवळपास ७१ मानव आणि ३० प्राणी विजेच्या धक्क्याने मरण पावले. ढवळीकर यांनी गोवा विधानसभेत माहिती दिली होती की, गोवा सरकारने गेल्या ५ वर्षात गोव्यात वीज वितरण प्रणाली सुधारण्यासाठी १२ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. एवढा मोठा खर्च करूनही लोकांचे मृत्यू सुरूच असून लोकांना वीज पुरवठा संकटाचाही सामना करावा लागत आहे.
'मिशन टोटल कमिशन'वर डोळा ठेवून अवाढव्य खर्च करण्यालाच भाजप सरकारचे प्राधान्य आहे हे स्पष्ट दिसत आहे. करोडो रुपये खर्च केले तरी प्रत्यक्षात काहीही होत नाही, असे खलप म्हणाले.
गोव्यात वीज पायाभूत सुविधा पूर्णपणे कोलमडल्या आहेत. उद्योगपती, व्यापारी आस्थापने आणि सरकारी विभाग यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची थकबाकी वसूल करण्यात सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. तथापि, दोन महिन्यांसाठी गरीब लोकांचे ५०० रुपये चुकल्यास सरकार त्यांचे घरगुती वीज कनेक्शन तोडण्यास तत्परता दाखवते , असे खलप म्हणाले.
अत्यंत असंवेदनशील, बेजबाबदार आणि भ्रष्ट भाजप सरकारपासून गोव्याला मुक्त करण्याची वेळ आली आहे. कामावर असताना सरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा देण्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल आपण सर्वांनी त्यांना कायमचा धडा शिकवूया, असे खलप यांनी म्हटले आहे.