मुंबईत अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची गोव्यात सुटका 

By पंकज शेट्ये | Published: January 11, 2024 05:06 PM2024-01-11T17:06:25+5:302024-01-11T17:07:15+5:30

अपहरण करणाऱ्या गुलाब खान ला ४१ कलमाखाली अटक केली तर अल्पवयीन मुलीला अपनाघरात पाठवले आहे.

Minor girl kidnapped in Mumbai rescued in Goa | मुंबईत अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची गोव्यात सुटका 

मुंबईत अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची गोव्यात सुटका 

वास्को: वास्को पोलीसांनी महाराष्ट्र, मुंबई येथील मालवणी पोलीस स्थानकाच्या हद्दीतून अपहरण झालेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीची वास्कोतून सुटका करून अपहरण करणाऱ्या संशयित गुलाब खान (वय २९) याला ताब्यात घेतले. मालवणी पोलीसांनी वास्को पोलीसांना संपर्क करून अपहरण झालेली अल्पवयीन आणि अपहरणकर्ता वास्कोत असल्याचे सांगितल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक रोहन नागेशकर इत्यादी पोलीसांनी त्वरित पावले उचलून बुधवारी (दि.१०) रात्री मुलीची अपहरणकर्त्याकडून सुटका केली. अपहरण करणाऱ्या गुलाब खान ला ४१ कलमाखाली अटक केली तर अल्पवयीन मुलीला अपनाघरात पाठवले आहे.

वास्को पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार ४ जानेवारी रोजी मालवणी पोलीस स्थानकावर १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याबाबत तक्रार नोंद झाली होती. मालवणी पोलीसांनी अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेण्याच्या कारवाईला सुरवात केली असता ती आणि तिचे अपहरण करणारा गुलाब खान गोव्यातील वास्को शहरात असल्याचे त्यांच्यासमोर उघड झाले. त्यानंतर मालवणी पोलीसांनी त्वरित वास्को पोलीसांना संपर्क करून त्याबाबत माहीती दिली. मुंबईतून अपहरण झालेली अल्पवयीन आणि तिचे अपहरण करणारा वास्कोत असल्याचे येथील पोलीसांना समजताच तिची सुटका करण्यासाठी पावले उचलण्यात आली. 

पोलीस उपनिरीक्षक रोहन नागेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांचे पथक तयार करून अपहरण झालेल्या मुलीचा आणि अपहरणकर्त्याचा शोध घेण्याच्या कामास सुरवात करण्यात आली. पोलीसांनी अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेण्याच्या कामाला सुरवात केल्याच्या काही तासातच त्यांना मुलीचा शोध लावण्यात येश आले. बुधवारी रात्री पोलीसांनी वास्को शहरातील एका भागातून अपहरण झालेल्या मुलीची अपहरणकर्त्याकडून सुटका केली. तसेच अपहरण करणाऱ्या गुलाब खान (मूळचा बिहार येथील) याला ताब्यात घेऊन नंतर त्याला ४१ कलमाखाली अटक केली. मुलीची सुटका केल्यानंतर पोलीसांनी तिला अपना घरात पाठवून दिले.

दरम्यान मालवणी पोलीस गोव्यात दाखल झाले असून लवकरच ते मुलीला आणि अपहरण करणाऱ्या आरोपीला घेऊन मुंबईला रवाना होणार असल्याची माहीती पोलीस उपनिरीक्षक रोहन नागेशकर यांनी त्यांना संपर्क केला असता दिली.

Web Title: Minor girl kidnapped in Mumbai rescued in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.