मिरामारच्या शाळेचा विद्यार्थी पोहचला नेदरलँडच्या संस्थेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 08:27 PM2019-08-24T20:27:29+5:302019-08-24T20:27:36+5:30
एखाद्या विद्यार्थ्यांसमोर जर लक्ष्य मोठे असेल व पुस्तकी अभ्यासासोबतच संशोधनाची आवड असेल तर तो विद्यार्थी किती उच्चस्थानी पोहचू शकतो
पणजी : एखाद्या विद्यार्थ्यांसमोर जर लक्ष्य मोठे असेल व पुस्तकी अभ्यासासोबतच संशोधनाची आवड असेल तर तो विद्यार्थी किती उच्चस्थानी पोहचू शकतो हे विशेष सक्सेना या युवकाने घेतलेल्या उंच भरारीवरून लक्षात येते. नर्सरी ते दहावीपर्यंत मिरामारच्या शारदा मंदिर विद्यालयात शिकलेल्या विशेषने बीटेकची पदवी प्राप्त केली आणि आता तो नेदरलँडच्या विद्यापीठातील झर्निके संस्थेमध्ये नॅनोसायन्स विषयात एमएसस्सीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी रुजू झाला आहे.
23 वर्षीय विशेष हा गोवा सरकारच्या सेवेतील वरिष्ठ अधिकारी विजय सक्सेना यांचा मुलगा आहे. एरव्ही आयआयटीचे शिक्षण घेतलेल्या विद्याथ्र्याची जेथे निवड होते, तिथे विशेष सक्सेना याची निवड झाली. आयआयटीची पदवी नसली तरी, संशोधनामध्ये त्याने दाखविलेला प्रचंड रस पाहून त्याची निवड केली गेली. शनिवारी तो नॅनोसायन्समध्ये एमएसस्सी करण्यासाठी गोव्याहून नेदरलँडला रवाना झाला. आपण दोन वर्षाचा हा अभ्यासक्रम पूर्ण करून मग पीएचडी करीन, मला संशोधन क्षेत्रातच माझे भविष्य घडवायचे आहे, असे विशेष याने लोकमतला सांगितले.
विशेषने मुंबईच्या आयआयटीमध्ये द्वीतीय वर्ष इंटर्नशीप केली आणि तृतीय वर्ष इंटर्नशीप पोर्तुगालमधील आयएनएलमध्ये केली. विशेषने देहराडूनमधील पेट्रोलियम अॅण्ड एनर्जी स्टडीज विद्यापीठात मटेरियल सायन्स विषयात (स्पेशलायङोशन इन नॅनोटेक्नोलॉजी) बीटेकचे शिक्षण पूर्ण केले. उच्च शिक्षण घेताना विशेषला चिकन पॉक्स व अन्य तत्सम काही व्याधींनाही सामोरे जावे लागले पण त्यावर मात करून त्याने शिक्षण पूर्ण केले. मुंबईच्या आयआयटीमध्ये त्याने काही संशोधन प्रकल्पांसाठी काम केले. रशियामधील टॉमसक पॉलिटेकनीक विद्यापीठात सेमिस्टर एक्सचेंज विद्यार्थी म्हणूनही तो जाऊन आला. आपल्या यशात अनेक शिक्षकांचा वाटा आहे पण मिरामारच्या शारदा हायस्कुलमध्ये मानुएल नावाच्या एका शिक्षकाने आपल्याला भौतिकशा आणि गणितामध्ये खूप चांगल्या प्रकारे शिकवले हे विसरता येत नाही असे विशेष म्हणाला.