कर्नाटकातील बिजापूर येथून बेपत्ता मुलगी मडगावात सापडली
By सूरज.नाईकपवार | Published: February 16, 2024 12:10 PM2024-02-16T12:10:56+5:302024-02-16T12:11:14+5:30
कर्नाटकातील बिजापूर येथून बेपत्ता झालेली एक अल्पवयीन मुलगी मडगावच्या काेकण रेल्वे स्थानकात सापडली.
मडगाव: कर्नाटकातील बिजापूर येथून बेपत्ता झालेली एक अल्पवयीन मुलगी मडगावच्या काेकण रेल्वे स्थानकात सापडली. ती रोजगाराच्या शोधात गोव्यात आली होती. येथे रोजगार मिळवून देउ असे कुणीतरी तिला सांगितले होते त्याच्या प्रतिक्षेत उभी असताना गस्तीवरील पोलिसांचे तिच्याकडे लक्ष गेले व ती युवती सापडली.
गुरुवारी वरील घटना घडली. ती मुलगी अकरावी इयत्तेत शिकत आहे. मंगळुरु एक्सप्रेस रेल्वेतून ती मडगावात आली होती. प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर ती भांबावलेल्या अवस्थेत उभी होती. यावेळी गस्तीवरील कोकण रेल्वे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय नाईक यांना ती दिसली. त्याने तिची आपुलकीने चौकशी करुन नंतर पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर पोलिस निरीक्षक सुनिल गुडलर यांनी त्या मुलीची चाैकशी केली असता, ती बिजापूर येथून आल्याचे कळाले. पोलिसांनी नंतर तीच्या घरच्या कुटुंबियांशीही संपर्क साधला, नंतर संबधितांनी मडगावात येउन त्या मुलीचा ताबा घेतला.
त्या मुलीचे वडील शिंपी व्यवसाय करीत आहेत तर आई घरकाम करते, घरची स्थिती बेताचीच असल्याने ती कुणालाही काहीही न सांगता घरातून पळून आली होती असेही तपासात आढळून आले आहे.