गोव्याचे पर्यटन मंत्र्यांचे मिशन 30 टक्के कमिशन; काँग्रेसचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 04:51 PM2020-06-05T16:51:47+5:302020-06-05T16:52:03+5:30
कोरोना संकटकाळात विदेशात नोकरी करुन पोट भरणारे अनेक गोमंतकीय आज गोव्यात परतत आहेत.
मडगाव: देशा बाहेरून जे खलाशी आणि इतर गोमंतकीय गोव्यात येऊ लागले आहेत त्यांना सक्तीने सशुल्क क्वारंटायन व्हावे लागत आहे. या खलाशाकडून पैसे आकारूनही त्यांना राहण्यासाठी ज्या खोल्या दिल्या जातात त्या निकृष्ट दर्जाच्या असल्याने या संबंधीचे व्हिडीओ व्हायरल होऊ लागले आहेत. त्यामुळे सरकारची नाचक्की होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांच्यावर तोफ डागली आहे. बाबूंच्या मिशन 30 टक्के कमिशनचा हा परिणाम असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
गोव्यातील भ्रष्ट भाजप सरकारचे पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांच्या 'मिशन ३० टक्के कमिशन" मुळे गोमंतकीय पर्यटक व्यावसायीकांना आपला धंदा चालवणे कठिण झाले असुन, सद्यपरिस्थीतीत आपल्या हॉटेलांची देखभाल करणेही त्यांना जड जात आहे, त्यामुळेच अनेक हॉटेलात कोरोंटायन केलेल्यांना आज त्रास सहन करावा लागत आहे असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते विठू मोरजकर यांनी केला आहे.
कोरोना संकटकाळात विदेशात नोकरी करुन पोट भरणारे अनेक गोमंतकीय आज गोव्यात परतत आहेत. परंतु, गोव्यातील भाजप सरकारने त्यांच्या कडुन शुक्ल वसुल करुन त्यांना खासगी हॉटेलात कोरोटांयन करुन ठेवले आहे. मागील दोन दिवस अश्या काही हॉटेलांतील अव्यवस्थेचे व्हिडीयो समाजमाध्यमांवर झळकले असुन, सदर परिस्थीती ही पर्यटनमंत्र्यांच्या लुटमारीने हवालदिल झालेल्यांची एक झलक आहे असा आरोप विठू मोरजकर यांनी केला आहे.
गोवा ट्रेव्हल व टुरीजम असोसिएशनने पर्यटन मंत्री बाबू आजगावकर लोकांना लुटत असल्याचा आरोप करून कमिशन गोळा करण्यात पर्यटन खात्यातील एका अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचे नावासकट मुख्यमंत्र्याना पत्र लिहीले होते. त्या पत्रातील आरोपांची चौकशी झाली का वा आपल्याला कमिशनचा वाटा मिळत असल्याने मुख्यमंत्र्यानी ते पत्र दडपले हे डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट करावे.
पर्यटनमंत्री बाबू आजगावकरांना पर्यटन खात्यात भ्रष्टाचाराचा विक्रम केला असुन, सरकारी सेवेत असलेले आपले बंधू डॉ. श्रीकांत आजगावकर, भावजय रश्मी आजगावकर व आपले कुटूंबिय यांना घेऊन इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या खर्चाने विदेश वारी करुन त्यांनी सरकारला लुटले आहे असाही आरोप त्यांनी केला.
बाबू आजगावकरांच्या लुटमारीने आज गोव्यातील प्रत्येक पर्यटक व्यावसायीक त्रस्त असुन, टॅक्सीवाले, शॅक व्यावसायीक, गोमंतकीय जीवरक्षक, हॉटेल चालक, इव्हेंट कंपनी त्यांना शाप देत आहेत.बाबू आजगावकरांना अधिक काळ पदावर ठेवल्यास अखेरची घटका मोजत असलेले पर्यटन क्षेत्र अखेरचा श्वास घेण्यास वेळ लागणार नाही हे भाजप सरकारने लक्षात ठेवावे असे मोराजकर यांनी म्हटले आहे.