एटीएम समजून चोराने पळवले चक्क पासबुक प्रिंटिंग मशीन
By आप्पा बुवा | Published: April 10, 2023 05:02 PM2023-04-10T17:02:47+5:302023-04-10T17:03:08+5:30
सोमवारी सकाळी बँकेचे मॅनेजर रोहित विश्वकर्मा शाखेत येताच त्यांच्या लक्षात सदर प्रकार आला.
फोंडा - खांडेपार येथील स्टेट बँकेच्या शाखेत रात्री चोराने एटीएम मशीन समजून पासबुक प्रिंटिंग मशीन पळवले. सदर चोरी प्रकरणात त्याच्या हातात काही रोख सापडली नसली तरी मशीन मात्र त्याने फोडून टाकल्याने बॅंकेला आर्थिक नुकसान झाले आहे.
सविस्तर वृत्तानुसार रविवारी रात्री एका चोराने एटीएमच्या बॉक्समध्ये प्रवेश केला. एटीएम मशीनच्या बाजूलाच पासबुक प्रिंटिंग मशीन आहे. त्याने ते मशीन उचलले व आपल्या सायकलवर घालून उड्डाणपूलाकडे ते मशीन तो घेऊन गेला. रात्री तिथे वर्दळ नसतेच. त्या संधीचा फायदा घेत त्याने संपूर्ण मशीन फोडून काढले व नंतर मशीन तिथेच टाकून त्याने पळ काढला.
सोमवारी सकाळी बँकेचे मॅनेजर रोहित विश्वकर्मा शाखेत येताच त्यांच्या लक्षात सदर प्रकार आला. त्यांनी लागलेच फोंडा पोलिस ठाण्यात यासंबंधी तक्रार दाखल केली. बँकेच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये चोर एकटाच सर्व काही करत असल्याचे आढळून आले आहे. सीसीटीव्ही मध्ये आपला चेहरा दिसू नये म्हणून त्याने अंगातील शर्ट डोक्याला गुंडाळा होता. पोलिसांनी सदर तक्रार नोंद करून घेतली असून पुढील तपास चालू केला आहे.