स्मार्टसिटीच्या बाबतीत निकृष्ट दर्जाचे काम केल्यास बिले रोखू, आमदार बाबुश मोन्सेरात यांचा इशारा
By किशोर कुबल | Published: January 16, 2024 01:54 PM2024-01-16T13:54:08+5:302024-01-16T13:55:00+5:30
स्मार्ट सिटीची कामांबाबत कंत्राटदारांना घालून दिली वैयक्तिक मुदत
किशोर कुबल, पणजी: स्मार्ट सिटीच्या बाबतीत निकृष्ट दर्जाचे काम केल्यास बिले रोखू, असा इशारा स्थानिक आमदार तथा महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांनी दिला आहे. कंत्राटदारांना कामे पूर्ण करण्यासाठी मुदत घालून दिली आहे.
मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल यांनी कंत्राटदारांची बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना बाबुश म्हणाले कि, सर्व कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याची आमची डेडलाइन कायम आहे. वेगवेगळे कंत्राटदार वेगवेगळी कामे करत आहेत. कोणी भूमिगत मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचे काम करत आहेत तर कोणी अन्य काम करत आहे. वाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झाल्याशिवाय रस्त्याचे काम हाती घेता येणार नाही. त्यामुळे वाहिन्या टाकणाय्रा कंत्राटदारांसाठी ठराविक मुदत दिली आहे. त्या मुदतीत त्यांनी कामे पूर्ण करायची आहेत.
बाबुश म्हणाले कि,‘ कामे पूर्ण करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत ३१ मे ची डेडलाइन आम्हाला पाळायची आहे. त्या अनुषंगाने कडक शब्दात कंत्राटदार, सल्लागार यांना सांगितले आहे. कामांच्या दर्जाबाबत आताच काही सांगता येणार नाही. त्यासाठी पावसाळा जावा लागेल. कामे निकृष्ट दर्जाची आढळून आल्यास सल्लागारांची बिले आम्ही रोखणार कारण सल्लागारच या गोष्टीला थेट जबाबदार असतील.’