म्हापसा बाजारातील प्रश्न सामोपचाराने सोडवू, आमदार जोशुआ डिसोझा यांचे व्यापाऱ्यांना आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2024 04:25 PM2024-02-04T16:25:40+5:302024-02-04T16:25:57+5:30
आमदार जोशुआ म्हणाले की, लोकांकडून जागा मिळेल तेथे दुचाक्या लावल्या जातात, त्यावर लवकरच तोडगा काढला जाईल.
म्हापसा : म्हापसा व्यापारी संघटनेने आमदार तथा उपसभापती जोशुआ डिसोझा यांची भेट घेऊन बाजारामध्ये करण्यात आलेली पार्किंग व्यवस्था व बाजारात येणारा मार्ग अडवण्यात आल्याने व्यापाऱ्यांना माल वाहतुकीत अडथळे येत आहेत. तसेच पार्किंग फी घेण्यासाठी नेमलेल्या नवीन कंत्राटदाराने आपली मनमानी चालवली आहे, अशा समस्या व्यापाऱ्यांनी आमदारांपुढे मांडल्या. आमदारांनी चर्चा करून त्यावर तोडगा काढला जाईल, असे सांगितले. लोकांना तसेच व्यापाऱ्यांना होणारा त्रास दूर केला जाईल, असे स्पष्ट केले.
आमदार जोशुआ म्हणाले की, लोकांकडून जागा मिळेल तेथे दुचाक्या लावल्या जातात, त्यावर लवकरच तोडगा काढला जाईल. बाजार समितीचे अध्यक्ष आशीर्वाद खोर्जुवेकर हे सर्व प्रश्न सोडवतील. ज्या समस्या असतील, त्या सामोपचाराने सोडवू. त्यासाठी व्यापारी वर्गाने आराखडा द्यावा. त्यावर सर्व संमतीने निर्णय घेतला जाईल. म्हापसा मार्केट हे पोर्तुगीज काळात बांधले गेले होते. त्यावेळी बाजाराची मांडणी एवढी सुंदर होती, तसेच आता पुढे ५० वर्षे नजरेसमोर ठेवून बाजाराची उभारणी झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
व्यापारी संघटनेचे सचिव सिद्धेश राऊत यांनी सांगितले की, नगरपालिकेने पार्किंगसाठी नवा कंत्राटदार नेमला आहे, त्यांनी गेट्स बंद केले आहे. तसेच नवीन कंत्राट ५० लाख रुपयांना दिला आहे. यापूर्वीचे कंत्राट १० लाखांचे होते. वाढीव रकमेमुळे जास्त पार्किंग फी आकारली जाईल. गेले १० महिने नगरपालिका फी गोळा करत होती. तेव्हा किती रक्कम जमा झाली, याची माहिती द्यावी.
नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांनी मार्केट तसेच टॅक्सी स्टॅन्डवर पे पार्किंग केले आहे. कंत्राटदाराबद्दल काही समस्या असल्यास व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.