आमदाराला 'भिवपाची गरज ना'; कथित नोकरी विक्री प्रकरणात 'क्लीन चिट'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2024 11:28 AM2024-12-01T11:28:23+5:302024-12-01T11:29:04+5:30

तपास पूर्ण

mla needs no fear clean chit in alleged job selling case | आमदाराला 'भिवपाची गरज ना'; कथित नोकरी विक्री प्रकरणात 'क्लीन चिट'

आमदाराला 'भिवपाची गरज ना'; कथित नोकरी विक्री प्रकरणात 'क्लीन चिट'

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांना कुळे पोलिसांनी एका कथित नोकरी विक्री प्रकरणात क्लीन चिट दिली आहे. पुराव्यांच्या अभावामुळे आमदार गावकर यांच्याविरुद्ध कोणताही दखलपात्र गुन्हा नोंद होऊ शकत नाही, असे कुळे पोलिसांनी तक्रारदाराला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

या प्रकरणातील तक्रारदार आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांना कुळे पोलिसांनी पत्र पाठविले आहे. त्यात पोलिस निरीक्षकांनी म्हटले आहे की, आमदार गावकर यांच्याविरुद्धच्या तक्रारीविषयी कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कोणताही दखलपात्र गुन्हा नोंदविता येणार नाही. दरम्यान, यापूर्वी कुळे पोलिसांनी ताम्हणकर यांना पाठविलेल्या पत्रात पुराव्यांची मागणी केली होती.

ऑडिओ रेकॉर्डिंगची मूळ प्रतही मागितली होती, तसेच उपलब्ध इतर पुरावेही देण्यास सांगितले होते. त्या पत्राला उत्तर देताना ताम्हणकर यांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवून काही लोकांची जबानी नोंदवून घेण्यास सांगितले होते, तसेच नोकरी विक्री संबंधातील एक व्हायरल ऑडिओ क्लिपचे रेकॉर्डिंग पोलिसांना दिले होते. त्यात ज्या व्यक्तीला नोकरी मिळाली आहे, त्याचे नाव आणि पत्ताही दिला होता.

काय आहे प्रकरण? 

वर्षभरापूर्वी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. दोन व्यक्तींमधील संवादाची ती क्लिप होती. त्यात बोलणारी एक व्यक्ती ही सरकारी नोकर होती. तर दुसऱ्या बाजूने बोलणारी व्यक्ती ही त्या सरकारी नोकराला निवडणुकीत आपल्या विरुद्ध काम केल्याचा ठपका ठेवून त्याच्या नोकरीसाठी आपण स्वतः खर्च केलेले पैसे परत मागत होती. पैसे परत मागणारी ही व्यक्ती म्हणजे आमदार गणेश गावकर आहे, असा दावा तक्रारदार सुदीप ताम्हणकर यांनी केला होता. तसेच त्यांच्याविरोधात ताम्हणकर यांनी कुळे पोलिस स्थानकात तक्रारही दिली होती.

किती पुरावे हवेत?

या प्रकरणात आमदार गावकर यांना क्लीन चिट देण्यात आल्यामुळे तक्रारदार सुदीप ताम्हणकर हे नाराज झाले आहेत. 'लोकमत'शी बोलताना ते म्हणाले की, या प्रकरणातील ठोस पुरावा म्हणजेच ऑडिओ क्लिप आपण पोलिसांना दिली आहे. त्यातील आवाज कुणाचा याची माहितीही दिली आहे, तरीही पोलिस जर गुन्हा नोंद करू शकत नाहीत, तर अलिकडे काही महिलांविरुद्ध गुन्हे कसे नोंदविले आहेत? विशेष म्हणजे त्या प्रकरणात ऑडिओ रेकॉर्डिंगही नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

सरकार नोकऱ्या विकते : सरदेसाई

नोकऱ्या विक्री प्रकरणातील खऱ्या मास्टरमाइंडपर्यंत पोलिस पोहोचलेलेच नाहीत. सरकारनेच नोकऱ्यांचा बाजार मांडला असून, कार्यकर्त्यांना त्या कामाला लावले आहे, अशी सणसणीत टीका आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे. गोवा ज्या दिशेने चालला आहे, त्यातून सावरणे कठीण आहे. आपण वेताळ देवाच्या दसरोत्सवासाठी आलो होतो. गोमंतकीय जनतेला चांगले दिवस यावेत, अशी आपण देव बेताळाकडे प्रार्थना केल्याचेही सरदेसाई यांनी म्हटले आहे.

...म्हणून बहुजन युवक नोकरीपासून वंचित : वाघ

सरकारी नोकऱ्या विक्रीमुळे राज्यातील होतकरू युवक बेरोजगार झाले आहेत. या घोटाळ्याचा सर्वांत जास्त फटका बहुजन समाजातील तरुणांना बसला आहे. या घोटाळ्यापासून सरकार स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. नोकऱ्या विकल्या जात असल्याने आरक्षण असलेल्या नोकऱ्या बहुजन समाजातील उच्च शिक्षित युवकांना मिळत नाहीत. सरकारकडून ही मोठी फसवणूक सुरू असल्याची टीका आपचे उपाध्यक्ष प्रा. रामराव वाघ यांनी केली आहे.
 

Web Title: mla needs no fear clean chit in alleged job selling case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.