कचरा गोळा करण्यासाठी आमदार फळदेसाई यांनी स्वखर्चाने घेतल्या रिक्षा
By समीर नाईक | Published: February 25, 2024 12:59 PM2024-02-25T12:59:14+5:302024-02-25T12:59:25+5:30
सदर चारही रिक्षा दररोज कुंभारजुवा मतदारसंघातील सातही पंचायतींमध्ये फिरणार आहेत आणि कचरा गोळा करणार आहेत
पणजी-आमदार राजेश फळदेसाईंनी पुढाकार घेत स्वतःच्या खर्चाने कचरा गोळा करण्यासाठी खास ४ रिक्षा खरेदी केल्या आहेत. हे खूप कौतुकास्पद आहे. आमदारांच्या पुढाकाराला लोकांची साथ मिळाल्यास कुंभारजुवा मतदारसंघ राज्यात स्वच्छ आणि सुंदर ठरण्यास वेळ लागणार नाही असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
आमदार राजेश फळदेसाई यांनी कचरा गोळा करण्यासाठी खास ४ रिक्षा मतदारसंघात आणल्या आहेत. या रिक्षांचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यहास्ते करण्यात आले. यावेळी आमदार राजेश फळदेसाई व इतर मान्यवर उपस्थित होते. फळदेसाईंनी स्वखर्चाने सुरू केलेल्या या स्वच्छता उपक्रमाचे मुख्यमंत्र्यांनी कौतूक करताना लोकांनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी केले.
सदर चारही रिक्षा दररोज कुंभारजुवा मतदारसंघातील सातही पंचायतींमध्ये फिरणार आहेत आणि कचरा गोळा करणार आहेत. प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसविणे शक्य नाही. अनेकदा सांगूनही लोक रस्त्याशेजारी प्लास्टीक व इतर कचरा फेकतात. रस्त्याशेजारी फेकलेला कचरा चांगला दिसत नाही. त्यामुळे आपण पुढाकार घेऊन या ४ रिक्षा खरेदी केल्या आहे, असे आमदार राजेश फळदेसाईं यांनी यावेळी सांगितले.
मतदारसंघातील पंचायतींमार्फत कचऱ्याची उचल होतेच. मात्र काही लोक सकाळच्या वेळेत रस्त्याशेजारी कचरा टाकतात आणि पसार होतात. हा असा कचरा रस्त्यावर उरता कामा नये. तो तात्काळ उचलला गेला पाहिजे. या ४ रिक्षांमध्ये प्रत्येकी १ ड्रायव्हर आणि दोन मजूर असे एकूण १२ जणांना रोजगारही मिळणार आहे.