गोव्यात आमदारांनी जोपासली मूर्तीकलेची परंपरा! स्वत: बनवताहेत गणेशमूर्ती

By किशोर कुबल | Published: September 7, 2023 02:55 PM2023-09-07T14:55:24+5:302023-09-07T14:56:17+5:30

मयें विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रेमेंद्र शेट स्वत: बनवताहेत गणेशमूर्ती

MLA Premendra Shet of Mayen Assembly Constituency makes Ganesh idol himself | गोव्यात आमदारांनी जोपासली मूर्तीकलेची परंपरा! स्वत: बनवताहेत गणेशमूर्ती

गोव्यात आमदारांनी जोपासली मूर्तीकलेची परंपरा! स्वत: बनवताहेत गणेशमूर्ती

googlenewsNext

पणजी : गोव्यात मयें विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांनी मूर्तीकलेची परंपरा जोपासली असून यंदाही आमदार प्रेमेंद्र शेट व बंधूंनी चिकणमातीच्या तब्बल ५०० गणेशमूर्ती बनविल्या आहेत. चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर आलेली आहे. चित्रशाळा गजबजू लागल्या असून मूर्तीकारांचे कसब लागत आहे. अशावेळी कुंभारवाडा, मयें येथे स्थानिक आमदारही प्रेमेंद्र शेट हे कुंचला हाती घेऊन गणेशमूर्तींच्या रंगकामात व्यस्त आहेत.

आमदार प्रेमेंद्र हे गोवा फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष असून महामंडळाचा कारभार सांभाळताना सवड काढून ते मूर्तीकाम करत आहेत. त्यांचे थोरले बंधू माजी सभापती दिवंगत अनंत शेट हेही स्वत: गणेशमूर्ती बनवत असत. मयेंतील कुंभारवाड्यावरच तब्बल दहा हजार गणेशमूर्ती बनवल्या जातात, अशी माहिती प्रेमेंद्र यांनी ‘लोकमत’ला दिली.

‘लोकांनी प्रदूषणकारी पीओपीच्या मूर्ती विकत घेऊ नये. चिकणमातीच्याच मूर्तींचा आग्रह धरावा, असे कळकळीचे आवाहन करताना प्रेमेंद्र म्हणाले की,‘ गणेशमूर्ती बनवणारी ही आमची तिसरी पिढी आहे. थोरले बंधू माजी सभापती अनंत शेट यांच्या निधनानंतर त्यांचा पुत्र अमरेश व आम्ही तीन भाऊ मिळून सर्वांनी हा व्यवसाय चालूच ठेवला. प्रेमेंद्र म्हणाले की, ‘हस्तकला महामंडळ मूर्तीमागे शंभर रुपये याप्रमाणे प्रत्येक मूर्तीकाराला कमाल २५ हजार रुपयांपर्यंत अनुदान देते. रंग, चिकणमाती महागली आहे. दरवर्षी रंगांचे दर १० ते १५ टक्यांनी वाढतात. त्यामुळे अनुदानाच्या रकमेत थोडी वाढ करणे गरजेचे आहे.’

ते पुढे म्हणाले कि,‘ आम्ही घरातील मंडळी स्वत: मूर्ती बनवतो त्यामुळे फार कामगार लागत नाहीत. आई, वडिलांकडून मूर्तीकाम शिकलो. या कामात भरपूर कष्ट आहेत. चिकणमाती मळण्यासाठी आता पाच मूर्तीकारांना मिळून सामायिकपणे मशिन हस्तकला महामंडळाने दिले आहे. त्यामुळे माती मळण्याच्या कामात थोडी सुलभता आली आहे. ही परंपरा जोपासण्यासाठी मुळात इच्छाशक्ती हवी. आम्ही गणेशमूर्तीच नव्हे तर सरस्वती, कृष्णाच्या तसेच अन्य देव-देवतांच्या मूर्तीही ॲार्डर घेऊन करतो.’ बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर हेही मूळ मयें येथील रहिवाशी होत. त्यांचे जुने घर मयेंमध्ये आहे. आर्लेकर हे या घरातच गणपती पुजतात व दरवर्षी चतुर्थीला मयें गावी येतात.
               
प्रवीण आर्लेकरांकडून स्तुती
मयेंचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी चिकणमातीपासून पारंपरिक गणेशमूर्ती बनवण्याची परंपरा कायम ठेवल्याबद्दल हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष आमदार प्रवीण आर्लेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव हाच खरा गणेशोत्सव असल्याचे त्यानी म्हटले असून प्रेमेंद्र यांनी ही कला जोपासल्याने त्यांची स्तुती केली आहे.

Web Title: MLA Premendra Shet of Mayen Assembly Constituency makes Ganesh idol himself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.