... तर गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ येईल; सुदिन ढवळीकरांनी दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 02:10 PM2020-04-29T14:10:19+5:302020-04-29T15:53:39+5:30
आपण म्हादईचा प्रश्नही राज्यपालांसमोर मांडला. म्हादई नदीचे पाणी कर्नाटक वळवतेय व त्यामुळे हे पाणी आटेल व गोव्याला परिणाम भोगावे लागतील असे आपण यापूर्वी म्हणालो होतो
पणजी : राज्य आर्थिकदृष्टय़ा खूप अडचणीत आहे व खर्च कपातीसाठी व्यापक व कडक उपाययोजना करणो गरजेचे बनले आहे. जर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी खर्च कपातीवर भर दिला नाही तर गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ येईल. गोव्याची वाटचाल त्याच दिशेने होईल असा इशारा मगोपचे नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी बुधवारी येथे दिला.
ढवळीकर म्हणाले, की आपण राज्यपाल सत्यपाल मलिक यांना कालच भेटलो. राज्यपाल चांगले काम करतात. त्यांना आमचा कायम पाठींबा असेल. सरकारने कोविद संकट काळात खर्चात खूप कपात करण्याची गरज आहे ही गोष्ट आपण राज्यपालांसमोर मांडली. राज्यपालांनी खनिज खाण धंदाही सुरू व्हावा म्हणून पुढाकार घेतला आहे. आपण म्हादईचा प्रश्नही राज्यपालांसमोर मांडला. म्हादई नदीचे पाणी कर्नाटक वळवतेय व त्यामुळे हे पाणी आटेल व गोव्याला परिणाम भोगावे लागतील असे आपण यापूर्वी म्हणालो होतो व पंतप्रधानांना पत्रही पाठवले होते. त्याच पत्रची प्रत मी राज्यपालांना दिली व वाठादेव- साखळी येथे म्हादई नदीच्या प्रवाहात आता एक फूट देखील पाणी राहिलेले नाही ही गोष्ट आपण राज्यपालांच्या नजरेस आणून दिली. राज्यपालांनी या विषयात लक्ष घालण्याची ग्वाही दिली आहे.
अधिवेशन बोलवा-
ढवळीकर म्हणाले, की मंत्री वगैरे 30 लाखांची कारगाडी खरेदी करू शकतात असे परिपत्रक नुकतेच अर्थ खात्याने काढले. पणजी महापालिकेने तर नवी महागडी कार खरेदीही केली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना या कार खरेदीविषयी काही माहिती नव्हते की त्यांना महापालिकेने मुद्दाम अंधारात ठेवले ते त्यांनीच सांगावे. खर्च कपातीच्या विषयावर चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी पाच दिवसांचे विधानसभा अधिवेशन बोलवावे. त्यात सर्व माजी मुख्यमंत्री व जाणकार आमदारांना बोलू द्या. सर्वाच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी ऐकाव्यात. केवळ एक समिती नेमली म्हणून होणार नाही. जर खर्च कपात झाली नाही तर राज्य पूर्ण आर्थिक कोंडीत सापडेल व राष्ट्रपती राजवट येईल. सर्व मंत्री- आमदारांना घरी जावे लागेल. मग आमदारांकडे महामंडळेही राहणार नाहीत.
राज्यात येत्या 15 मेनंतर मोठी पाणी टंचाई निर्माण होईल. ओपाचे सध्याची पाणी पातळी बांधकाम खाते त्यावेळी कायम राखूच शकणार नाही. म्हादई नदीतील पाणी ज्या वाठादेव येथे पूर्ण आटले, त्या जागेपासून मुख्यमंत्री सावंत यांचे निवासस्थान केवळ पाच किलोमीटरवर आहे. वाठादेवला फक्त एक पाऊल बुडेल एवढीच सध्या पाण्याची पातळी आहे. सध्या गोव्यात पर्यटक नसल्याने ओपाला पाण्याची पातळी योग्य आहे पण एकदा पर्यटन धंदा सुरू झाल्यानंतर वस्तूस्थिती उघड होईल, असे ढवळीकर म्हणाले.