गोव्यात मिळणार कॅन्सरवर आधुनिक उपचार: मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 03:00 PM2023-07-29T15:00:20+5:302023-07-29T15:01:41+5:30
टाटा मेमोरिअल हॉस्पिटलबरोबर करार; मंत्र्यांकडून मार्गदर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : गोव्यात आता कॅन्सरवर पूर्ण उपचार पद्धत रुग्णांना मिळणार असून, गोव्यातील कुठल्याच रुग्णाला कॅन्सरवर उपचार करण्यासाठी मुंबईत जावे लागणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. टाटा मेमोरिअल हॉस्पिटल, मुंबई, गोवा सरकार व केंद्र सरकारच्या संयुक्त विद्यमाने गोव्यात कॅन्सर हॉस्पिटलचा करार करण्यात आला.
शुक्रवारी राजभवन दरबार हॉलमध्ये मुख्यंमत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, टाटा मेमोरिअल हॉस्पिटलचे डॉ. राजेंद्र बडवे, गोवा आरोग्य खात्याचे सचिव अरुणकुमार मिश्रा, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, आरोग्य खात्याच्या संचालिका गीता काकोडकर, टाटा मेमोरिअल हॉस्पिटलच्या इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला.
गोव्यात टाटा मेमोरिअल हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने लवकरच आधुनिक कॅन्सर उपचार पद्धतीवर मोठे हॉस्पिटल खुले केले जाणार आहे. हे हॉस्पिटल सुरू होईपर्यंत सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कॅन्सर ओपीडी खुली केली आहे. त्यानंतर लवकरच हे हॉस्पिटल सुरू झाल्यावर सर्व आधुनिक प्रकारचे कॅन्सर उपचार सुरू केले जाणार आहेत. गोवा सरकारने आरोग्य क्षेत्रासाठी मोठी आर्थिक तरतूद केली आहे. गोव्यातील जनतेला सर्व आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी हे सरकार काम करत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
गोव्यात प्रति वर्ष १ हजार कॅन्सरचे रुग्ण आढळतात. टप्प्यात उपचार घेण्यासाठी येतात. कॅन्सरवर मात करण्यासाठी रुग्णांनी सुरुवातीच्या स्तरावर उपचार घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आता आरोग्य कर्मचाऱ्यांनी लोकांमध्ये जागृती केली पाहिजे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
आरोग्य क्षेत्रासाठी ऐतिहासिक क्षण
गोव्याच्या आरोग्य क्षेत्रातील हा ऐतिहासिक क्षण आहे. टाटा मेमोरिअल हॉस्पिटलबरोबर गोवा सरकारने केलेल्या करारामुळे गोव्यात आता आधुनिक पद्धतीचे कॅन्सर हॉस्पिटल होणार आहे. याचा फायदा गोमंतकीय रुग्णांना होणार आहे. गोव्यातील अनेक रुग्ण हे मुंबईत टाटा हॉस्पिटलमध्ये कॅन्सरवर उपचार घेतात. आता गोव्यात ही उपचार पद्धती सुरु होणार आहे. पंतप्रधान तसेच मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने हे शक्य झाले आहे. सर्व आरोग्य कर्मचायांनी रुग्णांना चांगली सेवा देण्यासाठी पुढाकार घ्यावा. कॅन्सरसारख्या रुग्णांना काळजी प्रेरणा देणे गरजेचे आहे. भविष्यात गोवा कॅन्सरवर आधुनिक उपचार करणारे राज्य ठरणार आहे, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले.