गोमेकॉच्या साहाय्यक प्रोफेसरचा विनयभंग
By admin | Published: April 16, 2017 02:39 AM2017-04-16T02:39:06+5:302017-04-16T02:41:33+5:30
पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील महिला साहाय्यक प्रोफेसरचा गोमेकॉच्या कार्यालयाच्या भिंतीवरच अश्लील मजकूर लिहून
पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील महिला साहाय्यक प्रोफेसरचा गोमेकॉच्या कार्यालयाच्या भिंतीवरच अश्लील मजकूर लिहून विनयभंग करण्याचा प्रकार घडला आहे. केवळ कर्मचाऱ्यांसाठीच खुल्या राहणाऱ्या या विभागात हा प्रकार घडला असला, तरी गोमेकॉचे डीन डॉ. प्रदीप नाईक यांनी या प्रकाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. या प्रकरणात आगशी पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गोमेकॉच्या शरीरशास्त्र विभागाच्या महिला साहाय्यक प्रोफेसरने आपला कार्यालयातच विनयभंग झाल्याची तक्रार नोंदविली आहे. गोमेकॉच्या प्रशासकीय इमारतीच्या बाजूला असलेल्या या कार्यालयाच्या गच्चीत कर्मचारी सोडल्यास इतरांना जाण्याची परवानगी नाही.
विद्यार्थीही तेथे जात नाहीत. त्याला लागूनच असलेला जुना फॉरेन्सिक विभागही आता नव्या इमारतीत हलविल्यामुळे या कार्यालयात केवळ मर्यादित माणसांचीच ये-जा असते. त्यामुळे हा उपद्व्याप करणारा कोणी बाहेरचा असण्याची शक्यता पोलीसही नाकारत आहेत.
संशयित गोमेकॉचाच एखादा कर्मचारी, अधिकारी असण्याची शक्यताही नाकारली जात नाही. तसे असेल तर गोमेकॉची प्रतिष्ठा धुळीला मिळण्याचा धोका आहे.
या प्रकरणात आगशी पोलिसांत तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी येऊन पंचनामा केला. भिंतीवर लाल रंगाने लिहिलेला हा मजकूर इंग्रजीत आहे. हे काम कोणी केले असावे, याबद्दल चर्चा चालू होती; परंतु ते लिहिताना पाहिलेला साक्षीदार नसल्यामुळे अज्ञाताविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ५०९ अंतर्गत विनयभंगाची आणि कलम ३ अंतर्गत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.(प्रतिनिधी)