सोमवारपासून माशांची सीमेवर तपासणी, मच्छीमार खात्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 09:00 PM2018-07-17T21:00:59+5:302018-07-17T21:01:05+5:30
येत्या सोमवारपासून माशांची राज्याच्या सीमेवर तपासणी केली जाईल. जर माशांमध्ये फॉर्मेलिन आढळले तर तिथेच ते मासे नष्ट केले जातील, असे मच्छीमार खात्याचे मंत्री विनोद पालयेकर यांनी
पणजी : येत्या सोमवारपासून माशांची राज्याच्या सीमेवर तपासणी केली जाईल. जर माशांमध्ये फॉर्मेलिन आढळले तर तिथेच ते मासे नष्ट केले जातील, असे मच्छीमार खात्याचे मंत्री विनोद पालयेकर यांनी मंगळवारी येथे जाहीर केले.
गेले काही दिवस सरकारवर सर्वबाजूंनी टीका सुरू असून माशांमध्ये फॉर्मेलिन असणो म्हणजेच मोठय़ा रोगाला निमंत्रण देणो असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. यामुळे गोमंतकीयांमध्ये धास्ती आहे. या पाश्र्वभूमीवर मंत्री पालयेकर लोकमतशी बोलताना म्हणाले, की आपले मच्छीमार खाते आता स्वस्थ बसू शकत नाही. गोमंतकीयांच्या आरोग्याच्या हितासाठी आम्ही पाऊले उचलत आहोत. येत्या सोमवारपासून मच्छीमार खात्याची यंत्रणा आणि अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) पथक राज्याच्या सीमांवर माशांचे ट्रक थांबविल आणि तिथेच माशांची चाचणी करून पाहिल. माशांमध्ये फॉर्मलिन आढळले तर लगेच आम्ही ते मासे जप्त करून तिथेच नष्ट करणार आहोत. त्या माशांची रितसर विल्हेवाट लावली जाईल. गोमंतकीयांच्या जेवणात नेहमीच मासे असतात. परप्रांतांमधून येणा:या माशांमध्ये फॉर्मेलिन रसायन असेल तर त्याविरुद्ध आम्हाला कारवाई करावीच लागेल. राज्यात रोज मोठय़ा प्रमाणात मासळी बाहेरून येते.
मंत्री पालयेकर म्हणाले, की आपल्या खात्याकडून लवकरच मच्छीमार विकास महामंडळ स्थापन केले जाणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे. येत्या दोन-तीन महिन्यांत महामंडळ प्रत्यक्ष स्थापन होईल. त्या महामंडळामार्फत सरकार परप्रांतांमधून माशांची आयात करील. फॉर्मेलिनमुक्त मासे आम्ही महामंडळामार्फत आणून गोमंतकीयांना देणार आहोत.
नागरिकांची उद्या बैठक
दरम्यान, फॉर्मेलिन मासळीविरुद्ध कृती योजना तयार करण्यासाठी गोव्यातील जागृत नागरिकांनी एकत्र येण्याचे ठरविले आहे. पहिली बैठक उद्या गुरुवारी बोलविण्यात आली आहे. सायंकाळी चार वाजता
मडगावमधील गोमंत विद्या निकेतनजवळील जार्दिम दोस आलिआदोस येथे ही बैठक होईल, असे माजी आमदार व ज्येष्ठ वकील राधाराव ग्रासियस यांनी जाहीर केले आहे. या सभागृहाची क्षमता चारशे आहे. मोठय़ा संख्येने लोकांनी उपस्थित रहावे, कारण हा प्रत्येकाच्या आरोग्याचा विषय आहे, असे ग्रासियस यांनी म्हटले आहे. फ्रान्सिस कुलासो व इतर अनेकांनी ग्रासियस यांच्या या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे.