गोवा-महाराष्ट्राच्या सीमांवर माकडतापाचे राज्य

By admin | Published: March 3, 2017 08:26 PM2017-03-03T20:26:00+5:302017-03-03T21:00:24+5:30

माकडतापाचे संकट गोव्यातील केवळ सत्तरी तालुक्यापुरतेच मर्र्यादित राहिलेले नाही तर गोवा व महाराष्ट्राच्या सगळ्याच सीमा माकडतापाच्या संभाव्य संकटाने ताब्यात घेतल्या आहेत.

Monkey State's State on Goa-Maharashtra | गोवा-महाराष्ट्राच्या सीमांवर माकडतापाचे राज्य

गोवा-महाराष्ट्राच्या सीमांवर माकडतापाचे राज्य

Next

ऑनलाइन लोकमत
पणजी, दि.03 - माकडतापाचे संकट गोव्यातील केवळ सत्तरी तालुक्यापुरतेच मर्र्यादित राहिलेले नाही तर गोवा व महाराष्ट्राच्या सगळ्याच सीमा माकडतापाच्या संभाव्य संकटाने ताब्यात घेतल्या आहेत. गोव्याची शासकीय यंत्रणा त्यामुळे सतर्क झाली आहेच, शिवाय सिंधुदुर्गच्याही यंत्रणेस सतर्क केले आहे. पेडण्यात प्रथमच माकडतापविरोधी (केएफडी) लसीकरण मोहीम हाती घेण्याचे सरकारने ठरविले आहे.
वनमंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी शुक्रवारी स्थितीचा आढावा घेतला. वन अधिकाऱ्यांशी तसेच आरोग्य अधिकाऱ्यांशीही त्यांनी चर्चा केली. लसीकरण करण्याची सूचना मंत्री आर्लेकर यांनी आरोग्य संचालकांनाही केली आहे. सत्तरी तालुक्यातील काही भागही महाराष्ट्रातील सिंधुदुर्गला जवळ आहेत. सिंधुदुर्गमधील आयी या गावची सीमा ही सत्तरी तालुक्यातील पर्ये आणि डिचोली तालुक्यातील कुडचिरे गावाच्या सीमेला टेकून आहे. याचप्रमाणे पेडणे तालुक्यातील पत्रादेवीचा भाग हा सिंधुदुर्गच्या म्हणजे बांद्याच्या हद्दीवर आहे.
आतापर्यंत सत्तरीतच माकडताप होता. प्रथम वाळपई मतदारसंघातून सुरू झालेला माकडताप आता पर्ये मतदारसंघातील केरीच्या पट्ट्यातही पोहचला आहे. यामुळे तिथे भीतीचे वातावरण असतानाच पेडणे मतदारसंघातील पत्रादेवी भागातील लोकही धास्तावले आहेत. मंत्री आर्लेकर यांनी शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की पेडण्यात माकडतापाचे रुग्ण सापडले नाहीत; पण सहा ते सात माकडे लोकांच्या घराच्या छपरावर मृतावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली. त्यामुळेच आपणही त्या भागास भेट दिली व शासकीय यंत्रणा सक्रिय केली. लोकांमध्ये चिंता आहे; कारण माकडांचा अचानक मृत्यू होत आहे. हे माकड बांद्याच्या भागातून आल्याची शक्यता आहे. आरोग्य खात्याच्या यंत्रणेस त्याविषयी सतर्क करून पेडण्यात लसीकरण लवकर सुरू करण्यास आपण सांगितले आहे. आरोग्य संचालकांशीही बोलणी झाली आहेत. केवळ लोकांनाच नव्हे तर पत्रादेवी व पेडणेतील अन्य गावांमधील वन कर्मचारी व आरोग्य कर्मचाऱ्यांचेही लसीकरण करण्यास सांगितले आहे.
आर्लेकर यांनी सांगितले की, मृत माकडांचे अवयव प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठविले आहेत. पंधरा दिवसांत अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण कळेल. माकडतापाचा संशय तूर्त कायम आहे. सिंधुदुर्गमधील यंत्रणेसही आम्ही सतर्क केले आहे. यापूर्वी पत्रादेवी भागात अशा प्रकारे कधी लोकवस्तीत माकड अचानक मेलेले सापडत नव्हते.

Web Title: Monkey State's State on Goa-Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.