भारतीय उपखंडातून मान्सूननं घेतला निरोप; हवामान खात्यानं केलं जाहीर
By वासुदेव.पागी | Published: October 19, 2023 03:24 PM2023-10-19T15:24:02+5:302023-10-19T15:24:15+5:30
गोव्यासह दक्षिणी राज्यात पावसाच्या सरी कोसळल्या. हवेत ओलावाही मोठ्या प्रमाणावर राहिला
पणजीः. नैऋत्य मान्सूनने शेवटी गोव्यातून आणि भारतीय उपखंडातूनही निरोप घेतल्याचे भारतीय हवामान खात्याने जाहीर केले आहे. सामान्यवेळेपेक्षा गोव्यातून तब्बल ८ दिवस तर देशातून ४ दिवस उशिराच मान्सून यंदा हटला आहे.
नैऋत्य मान्सूनचा परतीचा प्रवास हा राजस्थानमधून सामान्यतः १७ सप्टेंबरपासून सुरू होत असतो. परंतु यंदा परतीचा प्रवास हा ८ दिवस उशिरा म्हणजेच २५ सप्टेंबर पासून सुरू झाला होता. ३ ते ५ ऑक्टोबरदरम्यान गुजरातमधून मान्सून माघारी फिरला तर महाराष्ट्रातून ९ ऑक्टोबरपर्यंतमान्सून परतला. ९ ऑक्टोबर नंतर मान्सूनच्या हाचालींची हवामन खात्यानेही वेबसाईटवर अपडेट दिली नाही. कारण या दरम्यानच्या काळात अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावर चक्रीय वारे निर्माण होऊन त्याचे कमी दाबाच्या पट्ट्यातही रुपांतर झाले होते.
त्यामुळे गोव्यासह दक्षिणी राज्यात पावसाच्या सरी कोसळल्या. हवेत ओलावाही मोठ्या प्रमाणावर राहिला. त्यामुळे मान्सूनचा मुक्काम वाढला होता. परंतु त्यानंतर वाऱ्याच्या दिशेत झालेले बदल आणि हवेतील कोरडापणा या निकषांवरून मान्सून गोव्यासह भारतीय उपखंडातून हटल्याचे हवामान खात्यानेजाहीर केले आहे.