‘मान्सून डेस्टिनेशन’ गोव्याची नवी ओळख! पावसाळ्यातही पर्यटकांची पसंती 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 12:39 PM2018-03-22T12:39:10+5:302018-03-22T12:39:10+5:30

पावसाळ्यातही पर्यटक मोठ्या संख्येने येऊ लागल्याने गोव्याची ओळख आता ‘मान्सून डेस्टिनेशन’ म्हणून होऊ लागली आहे. २0१७ मध्ये पावसाळ्यात त्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत पर्यटकांची ६0 टक्के वाढ दिसून आली.

'Monsoon Destination' Goa's new identity! Tourists' favorite during rainy season | ‘मान्सून डेस्टिनेशन’ गोव्याची नवी ओळख! पावसाळ्यातही पर्यटकांची पसंती 

‘मान्सून डेस्टिनेशन’ गोव्याची नवी ओळख! पावसाळ्यातही पर्यटकांची पसंती 

Next

पणजी - पावसाळ्यातही पर्यटक मोठ्या संख्येने येऊ लागल्याने गोव्याची ओळख आता ‘मान्सून डेस्टिनेशन’ म्हणून होऊ लागली आहे. २0१७ मध्ये पावसाळ्यात त्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत पर्यटकांची ६0 टक्के वाढ दिसून आली.

मान्सून फेस्टिव्हल म्हणून पावसाळ्यात खास उपक्रम राबवले जातात तसेच पर्यटकांना स्पेशल पॅकेज दिले जाते. धबधबे, झरे, तलाव हेही पर्यटकांचे आकर्षण बनलेले असते. मान्सूनमध्ये दुधसागर धबधब्यावर पर्यटक मोठी गर्दी करीत असतात.

पर्यटन खात्याने नुकतेच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जून ते सप्टेंबर या कालावधीत पर्यटकसंख्या तुलनेत वाढत आहेत. २0१७ मध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत १९ लाख १५ हजार पर्यटक गोव्यात आले. त्याआधीच्या वर्षात २0१६ मध्ये याच कालावधीत ११ लाख ९३ हजार पर्यटक आले. गेल्या वर्षी पावसात  १८ लाख ५५ हजार देशी पाहुण्यांनी उपस्थिती लावली तर २0१६ मध्ये पावसाळ्यात ही संख्या ११ लाख ४८ हजार इतकी होती. विदेशी पर्यटकही पावसाळ्यात येऊ लागले आहेत. गेल्या वर्षी मान्सूनमध्ये ६0 हजार १६१ विदेशी पर्यटक आले तर २0१६ मध्ये याच कालावधीत विदेशी पाहुण्यांची संख्या ४५ हजार ४३७ होती. जून २0१७ मध्ये ३0.७५ टक्क्यांनी पर्यटक वाढले. जुलैमध्ये ६१.४४ टक्क्यांनी, आॅगस्टमध्ये ७१.३९ टक्क्यांनी तर सप्टेंबरमध्ये ९४.५५ टक्क्यांनी पर्यटकसंख्या वाढल्याचेही ही आकडेवारी सांगते. 

गोव्याचा पर्यटक मोसम आॅक्टोबरमध्ये सुरु होतो. परंतु अलीकडच्या काळात सप्टेंबरमध्येच पर्यटक दाखल होतात. ३६५ दिवस पर्यटनाची जाहिरात केली जाते त्याचा परिणामही दिसून आला आहे.

 साहसी पर्यटन उपक्रम आकर्षण : मिनीन डिसोझा

पर्यटन खात्याचे संचालक मिनीन डिसोझा यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आम्ही साहसी पर्यटनाच्या काही उपक्रमांमध्ये वाढ केलेली आहे. पावसाळ्यात म्हादई राफ्टिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ट्रॅकिंगसाठीही पर्यटक येऊ लागले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे आता देशी पर्यटकांना कळून चुकले आहे की, मान्सूनमध्ये गोव्यात हॉटेलांचे भाडे कमी असते. शिवाय आॅफ सिझन असल्याने प्रवासही स्वस्तात करता येतो. काहीजणांना थंडीच्या मोसमात किंवा उन्हाळ्यात गर्दीच्या दिवसात येण्यापेक्षा मान्सूनमध्ये येणे आवडते. गोवा हे आता ३६५ दिवस पर्यटनाचे केंद्र बनले आहे. 

 पावसात उत्तर भारतीयांचे प्रमाण जास्त 

अखिल गोवा हॉटेलमालक संघटनेचे अध्यक्ष गौरीश धोंड म्हणाले की, पावसाळ्यातही पर्यटक येऊ लागले आहेत, ही गोष्ट खरी आहे. परंतु पर्यटन खात्याकडून आकडेवारी दिली जाते तेवढे हे प्रमाण लक्षणीय मुळीच नाही. दिल्ली, गुजरात तसेच खास करुन उत्तर भारतात शाळांना उशिरा सुट्ट्या असतात या काळात येथे पाऊस सुरु झालेला असतो. पावसाचा आनंद लुटण्यासाठी म्हणून खास येणारे देशी पर्यटकही आहेत. राजधानी पणजी शहरात आजच्या घडीलाही हॉटेलमधील खोल्यांची आॅक्युपन्सी ५0 टक्के एवढीच आहे. अशा वेळी आम्ही खोल्या रिकाम्या ठेवण्यापेक्षा दर कमी करतो.’ ते पुढे म्हणाले की, ‘मुंबई-गोवा बोट सुरु झाल्यावर गोव्यात देशी पर्यटकांची संख्या वाढणार आहे. दर दिवशी सुमारे ५00 पर्यटक या बोटीतून येतील त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांना त्याचा फायदा होईल.’ 

Web Title: 'Monsoon Destination' Goa's new identity! Tourists' favorite during rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.