मान्सून दोन दिवस अगोदरच केरळात दाखल; चार पाच दिवसात गोव्यात
By वासुदेव.पागी | Published: May 30, 2024 03:02 PM2024-05-30T15:02:13+5:302024-05-30T15:04:35+5:30
मान्सून दाखल होण्याआधी दोन-तीन दिवसापासून मान्सूनच्या पूर्वसरी गोव्याला मिळतील.
वासुदेव पागी, पणजी: ग्रीष्माच्या दाहाने देश होरपळत असतानाच एक दिलासादायक गोड बातमी भारतीय हवामान खात्याने दिली आहे. मान्सून केरळात दाखल झाला असून ३ जूनपर्यंत तो गोव्यातही दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून दाखल होण्याआधी दोन-तीन दिवसापासून मान्सूनच्या पूर्वसरी गोव्याला मिळतील.
हवामान खात्याच्या अंदाजापेक्षा दोन दिवस अगोदरच मान्सून केरळात दाखल झाला आहे. तो वेगाने पुढे येत असून हीच गती कायम राहिल्यास गोव्यालाही पाऊस लवकरच मिळणार आहे. आता उष्णतेची लाट हळू हळू ओसरणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे. येत्या काही दिवसांत अरबी समुद्रातून वारे वाहू लागल्याने तापमानातही काही अंशांची घट अपेक्षित आहे.
सध्या तरी अरबी समुद्रावरील हवामान हे मान्सूनसाठी अत्यंत पोषक आहे. त्यामुळे मान्सून अधिक सक्रिय होऊन वेगाने मार्गक्रमण करीत आहे. केरळ मधून एक-दोन दिवसात दक्षिण कर्नाटकात नंतर मध्य व उत्तर कर्नाटकात आणि गोव्यात दाखल होणार आहे. मान्सून गोव्यात दाखल होण्याची सामान्य वेळ ही पाच जून अशी असते. यंदा वेळेवर म्हणजेच ५ जून रोजी किंवा एक दोन दिवस अगोदर मान्सून दाखल होणार असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला होता.