मान्सून केरळात दाखल; गोव्यात 5 जूनपर्यंत आगमन होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 08:37 PM2020-06-01T20:37:10+5:302020-06-01T20:37:38+5:30
सात वर्षात पहिल्यांदाच पाऊस वेळेवर
पणजी: बऱ्याच काळानंतर नैऋत्य मान्सूनने सोमवारी केरळ किनारपट्टीला धडक दिली. 5 ते 6 जूनपर्यंतत मान्सून गोव्यात दाखल होण्याची पूर्ण शक्यता आहे. बदललेल्या हवामानामुळे अत्यंत सक्रीय झालेला मान्सून केरळात पोहोचल्याचे भारतीय हवामान खात्याने जाहीर केले आहे. मान्सूनची गती पाहता 5 जूनपर्यंत तो गोव्यात दाखल होण्याची पूर्ण शक्यता आहे.
अरबी समुद्रात उत्पन्न झालेले वातावरण हे मान्सूनसाठी अत्यंत पोषक असून मान्सूनची गती त्यामुळे वाढली आहे. वाढलेल्या गतीमुळेच चार दिवसांपूर्वी हवामान खात्याने आपले पूर्वीचे मान्सूनसंबंधी अंदाज मागे घेत नव्याने अंदाज वर्तवले होते. त्यात मान्सून 1 जून रोजी केरळात दाखल होणार असल्याचे म्हटले होते.
20 वर्षांत दुसऱ्यांदा वेळेवर
मान्सून केरळात दाखल होण्याची सामान्य तारीख ही 1 जून ही आहे. परंतु वर्ष 20 वर्षांनंतर दोनदांच ही वेळ पाळली आहे. 2013 साली आणि या वर्षी.
निसर्ग चक्रीवादळ
अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्टय़ाची तीव्रता वाढल्यामुळे त्याचे चक्रिवादळात रुपांतर होवून 3 जूनला दक्षिण गुजरात आणि महाराष्ट्रात आदळेल असे हवामान खात्याने म्हटले आहे. या चक्रीवादळाचे ‘निसर्ग’ असे नामकरण होणार असून बांगलादेशने सुचवलेले हे नाव आहे. याचा परिणाम गुजरात, मराष्ट्रासह गोव्यावरही होणार असून गोव्यात अनेक भागात 3 जूनपर्यंत जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.