...तर ५ जूनपर्यंत मान्सून गोव्यात
By Admin | Published: May 15, 2015 01:18 AM2015-05-15T01:18:22+5:302015-05-15T01:18:35+5:30
पणजी : गुरुवारी राज्यात अनेक भागांत पावसाने दमदार हजेरी लावली. मडगावमध्ये दुपारी जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने लोकांची तारांबळ उडाली
पणजी : गुरुवारी राज्यात अनेक भागांत पावसाने दमदार हजेरी लावली. मडगावमध्ये दुपारी जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने लोकांची तारांबळ उडाली. शुक्रवारी गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, मान्सून ३0 मेपर्यंत केरळात पोचेल, असा अंदाज केंद्रीय वेधशाळेने व्यक्त केल्याने हवामान पोषक राहिल्यास ५ जूनपर्यंत गोव्यात धडकण्याची शक्यता आहे.
गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते आणि उष्माही वाढला होता. पुढील चार दिवस ढगाळ आणि पावसाळी वातावरण राहील.
येथील वेधशाळेचे साहाय्यक शास्त्रज्ञ एन. हरिदासन यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या कोसळणारा पाऊस कर्नाटकातील अंतर्गत भागात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे, तसेच लक्षद्वीपजवळ वादळसदृश स्थितीमुळे आहे.
गेल्या २४ तासांत अनेक भागांत पावसाची नोंद झाली असून सांगेत १८.१ मि.मि, काणकोणात १५.२ मि.मि, केपेंत ८.८ मि.मि, मडगाव ७.१ मि.मि, वाळपईत ६.२ मि.मि, फोंड्यात ५.६ मि.मि, मुरगाव व दाबोळीत ४.२ मि.मि, पणजीत ३.८ मि.मि पावसाची नोंद झाली.
राजधानी पणजीत सर्वाधिक ३४.७ डि. सें तापमानाची नोंद झाली. आर्द्रता ७0 ते ८0 टक्क्यांवर आहे. त्यामुळे उष्मा जाणवत आहे. (प्रतिनिधी)