मान्सून ४८ तासात केरळात, गोव्याला मिळणार जोरदार पूर्वसरी
By वासुदेव.पागी | Published: June 2, 2023 06:27 PM2023-06-02T18:27:27+5:302023-06-02T18:27:58+5:30
गोव्यात मान्सूनच्या पूर्वसरींचा जोरदार वर्षाव होण्याची शक्यता आहे.
वासुदेव पागी, पणजी: सक्रीय झालेला मान्सून दक्षिण अरबी समुद्रात दाखल झाला असून तो वेगाने नैऋत्येकडे सरकत असल्यामुळे येत्या ४८ तासात मान्सून केरळ किनारपट्टीला धडक देऊ शकतो. त्यामुळे ३ ते ४ जून या दिवसात गोव्यात मान्सूनच्या पूर्वसरींचा जोरदार वर्षाव होण्याची शक्यता आहे.
लांबणीवर पडलेला मान्सून ४ जूनपर्यंत केरळात दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने आपल्या पहिल्या दीर्घ अंदाजात वर्तविला होता. हा अंदाज अचूक सिद्ध होण्याचे संकेत असून सक्रीय झालेला मान्सून मालदीव समुद्रातून दक्षिण अरबी समुद्रात दाखल झाल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. त्यामुळे मान्सून ४८ तासात केव्हाही केरळ किनारपट्टीतून भारतीय उपखंडात शिरू शकतो. तसे झाल्यास कर्नाटक व गोव्यातील किनारपट्टीभागात जोरदार मान्सूनपूर्व सरी कोसळतील असेही हवामान खात्याने म्हटले आहे.