अधिवेशन पाऊस गाजविणार? जोरदार पावसाचा अंदाज, केसरी अलर्ट जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 03:16 PM2023-07-17T15:16:20+5:302023-07-17T15:18:33+5:30
अधिवेशन विधानसभापटू गाजविणार की पाऊस अधिक गाजविणार याबाबत कुतूहल निर्माण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोवा विधानसभेचे अधिवेशन मंगळवारपासून सुरू होत आहे. मात्र हे अधिवेशन विधानसभापटू गाजविणार की पाऊस अधिक गाजविणार याबाबत कुतूहल निर्माण झाले आहे.
कारण या कालावधीत पाऊस जोरदार कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मान्सून सक्रिय झाल्याचे हवामान खात्याने यापूर्वीच जाहीर केले होते. तसेच रविवार आणि सोमवारी पिवळा अलर्ट तर मंगळवारपासून पुढील दिवसांसाठी केसरी अलर्ट जारी करण्यात आला आहे. मंगळवार ते गुरुवारसाठी जारी करण्यात आला आहे. त्या पुढील दिवसात कशी परिस्थिती असेल त्याबद्दल तूर्त काहीच स्पष्ट केलेले नाही. शुक्रवारी व त्यानंतरही तशीच परिस्थिती राहू शकते किंवा पाऊस वाढून लाल अलर्टही जारी केला जाऊ शकतो, तसेच मान्सून कमजोरही होऊ शकतो. तूर्त शुक्रवारपर्यंत जोरदार पाऊस पडणार असल्याची मात्र पूर्ण शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेले चक्रियवारे आणि ओडिशा झारखंड पट्ट्यात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा, याच्या प्रभावामुळे मान्सून अधिक सक्रिय झाल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. दरम्यान सक्रिय झालेल्या मान्सूनने रविवारी सकाळी ८:३० पर्यंतच्या २४ तासात अर्धा इंच पाऊस पाडला. त्यानंतर रात्री ८:३० वाजेपर्यंतच्या १२ तासात राज्यात अनेक ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या, मात्र वाळपईत जोरदार पाऊस पडला. वाळपईत १२ तासात अर्धा इंच पाऊस नोंद झाला. राज्यात हंगामी पाऊस ६४ इंच इतका नोंद झाला आहे. ११ टक्के अतिरिक्त पाऊस आतापर्यंत राज्याला मिळाला आहे.