सलामीलाच गदारोळ, कामकाज सलग दोनवेळा तहकूब; हक्कभंगाच्या मागणीवरून सत्ताधारी आक्रमक
By वासुदेव.पागी | Published: July 15, 2024 12:54 PM2024-07-15T12:54:26+5:302024-07-15T12:56:10+5:30
गोवा विधानसेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कामकाज सुरू होताच हक्कभंगाच्या मागणीवरून कामकाज अर्धा तास तहकूब करावे लागले.
वासुदेव पागी,पणजीःगोवा विधानसेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कामकाज सुरू होताच हक्कभंगाच्या मागणीवरून कामकाज अर्धा तास तहकूब करावे लागले. कॉंग्रेसचे आमदार एल्टॉन डिकॉस्टा यांनी सभापती रमेश तवडकर यांच्या विरुद्ध एसटी राखीवतेच्या ठरावा संदर्भात आक्षेपार्ह भाष्य केल्याचा दावा सत्ताधारी सदस्यांचा होता आणि त्यासाठी एल्टन यांनी सभापतींची माफी मागावी असा आग्रह त्यांनी धरला होता.
सोमवारी अधिवेशनाची सुरूवात झाल्यानंतर प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला. आमदार एल्टन यांनी एसटी आरक्षणाच्या संदर्भात खाजगी ठरावाची मागणी सभापतींकडे केली होती. ती मागणी फेटाळल्यामुळे एल्टन यांनी सभापतींविरुद्ध आक्षेपार्ह टीपण्णी केल्याचा दावा आमदार दाजी साळकर यांनी केला. त्यामुळे हा सभापतींचा हक्कभंग ठरतो असा त्यांचा युक्तिवाद होता. या कारणामुळे एक तर एल्टन यांनी सभापतींची माफी मागावी किंवा सभापतींनी एल्टन यांच्या विरोधात हक्कभंगाची कारवाई करावी अषी साळकर आणि इतर सत्ताधारी सदस्यांची मागणी होती.
यावर आमदार एल्टन तसेच इतर विरोधी सदस्यांनी माफी मागण्यास नकार दिला. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव उभे राहून त्यांनी सांगितले की ही हुकूमशाही असून कोणत्याही प्रकारे माफी मागितली जाणार नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी आपल्या मागणीचा आवाज चढवीत गदारोळ केला. सभापती रमेश तवडकर यांनी सभागृह अर्ध्यातासासाठी तहकूब करण्यात जाहीर केले. तहकूबी संपवून पुन्हा कामकाजाला सुरूवात झाली तेव्हा विरोधीपक्षनेते युरी यांनी याप्रकरणात पुन्हा एकदा एल्टन डिकॉस्टा यांचे समर्थन करताना त्यांनी माफी मागण्याचा प्रश्नत उद्भवत नाही असे सांगितले आणि माफी मागण्यास साफ नकार दिला. त्यामुळे पुन्हा गरारोळ झाला आणि पुन्हा एकदा कामकाज तहकूब करण्यात आले.