‘कदंब’चे पास वितरण बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 12:06 PM2018-11-01T12:06:37+5:302018-11-01T12:06:57+5:30
नियमित प्रवाशांसह विद्यार्थ्यांची परवड
पणजी : गोव्यात सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या कदंब महामंडळाने नियमित प्रवास करणाऱ्यांना तसेच खास करुन शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिले जाणारे सवलतीच्या दरातील पास वितरित करणे बंद केले आहे. सरकारकडून सबसिडी मंजूर न झाल्याच्या कारणास्तव तूर्त पास बंद करण्यात आले असून यामुळे प्रवाशांची मोठी अडचण झाली आहे. नियमित प्रवासी तसेच विद्यार्थ्यांना पूर्ण तिकीटभाडे देऊनच प्रवास करावा लागेल. सुमारे २२ हजार पासधारकांना याचा फटका बसणार आहे.
मासिक, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक पास घेणाºयांची मोठी परवड झाली आहे. डिसेंबरनंतरच पासबाबत निर्णय होईल, असे महामंडळाच्या कार्यालयातून सांगण्यात येते. गेल्या वर्षीही ‘कदंब’ने असाच घोळ घातला होता त्यानंतर ‘लोकमत’ने पाठपुरावा केला आणि वित्त खात्याने सबसिडी मंजूर केल्यानंतरच पास वितरण सुरु झाले. गत साली झालेला घोळ माहीत असतानाही महामंडळाने वेळीच ही सबसिडी मंजूर करुन घेण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करायला हवा होता किंवा सरकारने तरी वेळीच सबसिडी मंजूर करायला हवी होती. याबाबतीत दोघेही निष्क्रिय ठरले, अशा संतप्त प्रतिक्रिया पासधारकांकडून येत आहे.
कदंब महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डेरीक परैरा नेटो यांना याबाबत विचारले असता योजनेची मुदत डिसेंबरमध्ये संपत आहे त्यामुळे योजनेचे नूतनीकरण आवश्यक आहे. सरकारला फाइल पाठवली असून सबसिडी मंजुरीच्या प्रतीक्षेत आम्ही आहोत. अधिसूचना काढल्यानंतरच पास वितरण सुरु केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
येथील बस स्थानकावर असलेल्या काउंटरवर पाससाठी लोक रोज रांगा लावतात. यात टर्म पास घेण्यासाठी विद्यार्थ्यांचाही समावेश असतो परंतु लांबलचक रांगेत तासन्तास घालवल्यानंतर माणूस काउंटरवर पोचतो तेव्हा त्याला पास वितरण बंद केल्याचे सांगण्यात येते. या काउंटरवर साधी नोटिस लावण्याचे सौजन्यही महामंडळाने दाखवलेले नाही. आणि त्याबाबत कोणी विचारले तर दुरुत्तरे दिली जातात. काऊंटरवरून गेल्या काही दिवसांत अनेक विद्यार्थ्यांना तसेच नियमित प्रवास करणाऱ्यांना पास न देता परत पाठवण्यात आले. विद्यार्थी, पालकांमध्ये त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.