टॅक्सी वादप्रश्नी मुख्यमंत्री सकारात्मक; मात्र स्थानिक टॅक्सी व्यावसायिक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2024 07:50 AM2024-08-23T07:50:15+5:302024-08-23T07:51:41+5:30

पेडणेत चक्काजाममुळे परिणाम; आज बैठक शक्य

mopa airport protest cm pramod sawant positive but the local taxi business is aggressive | टॅक्सी वादप्रश्नी मुख्यमंत्री सकारात्मक; मात्र स्थानिक टॅक्सी व्यावसायिक आक्रमक

टॅक्सी वादप्रश्नी मुख्यमंत्री सकारात्मक; मात्र स्थानिक टॅक्सी व्यावसायिक आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्क पेडणे/पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी टॅक्सी व्यावसायिकांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पाऊले उचलत दोन-तीन मागण्या मान्यही केल्या. पण काही टॅक्सी व्यावसायिक इरेला पेटले आहेत. त्यांनी चक्काजाम आंदोलनही करून सरकारी यंत्रणेला जेरीस आणले आहे.

पेडणे तालुक्यातील टॅक्सी व्यावसायिकांनी काल, गुरुवारी विविध मागण्यांसाठी पेडणे बाजारात एकत्र येत आंदोलन सुरू केले, जोपर्यंत आमच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन मुख्यमंत्री स्वतः पेडण्यात येऊन देत नाहीत तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असा इशारा देत शेकडोंच्या संख्येने टॅक्सी व्यावसायिकांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.

सकाळी १०.३० वाजता श्री भगवती देवीला श्रीफळ ठेवून व साकडे घालून आंदोलनाला सुरुवात झाली. भरपावसातही आंदोलन सुरूच होते. मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पेडण्यातील स्थानिक टॅक्सी व्यावसायिकावर होणाऱ्या अन्यायविरोधात काल पुकारण्यात आलेल्या आंदोलनात मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर, पेडणे मतदार संघाचे आमदार प्रवीण आर्लेकर, आमदार क्रूस सिल्वा, दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस, मांद्रे माजी सरपंच अॅड. अमित सावत, काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील कौठणकर यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी खासदार विरियातो फर्नाडिस यांनी सरकारने गोमंतकीयांचा विचार करून स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांना न्याय देण्याची मागणी केली. पेडणे बाजारात काल सकाळी हजारोंच्या संख्येने टॅक्सी व्यावसायिक जमले होते. अधूनमधून पडणाऱ्या पावसातही व्यावसायिक न्याय मिळवण्यासाठी उभे होते.

... म्हणून आंदोलन

विमानतळावरील काऊंटर, टोल, वाढीव पार्किंग शुल्क, गोवा माईल्स हटवावे यासह विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून पेडणेतील स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांचे आंदोलन सुरू आहे. याबाबत वारंवार सरकारकडे मागणी करूनही दुर्लक्ष केल्याने काल टॅक्सी व्यवसायिकांनी कडक भूमिका घेतली आहे.

आरोलकर, आर्लेकर यांचा समजावण्याचा प्रयत्न

यावेळी आमदार जीत आरोलकर, प्रवीण आर्लेकर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु मुख्यमंत्री ठोस आश्वासन देत नाहीत तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, असा पवित्र घेत आंदोलन सुरूच ठेवले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी आर्लेकर यांनी गोवा माईल्स आपणालाही नको असल्याचे सांगत याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री म्हणतात...

दरम्यान, मुख्यमंत्री सावंत हे काल दिल्लीस होते. त्यांनी टॅक्सी व्यावसायिकांना आज दुपारी बैठकीसाठी पणजीत बोलावले आहे. मुख्यमंत्र्यांनी दिल्लीहून फोनवर 'लोकमत'ला सांगितले की, मी टॅक्सी व्यवसायिकांच्या मागण्या मान्य केल्या आहेत, तरीही अकारण काहीजण आंदोलन करत आहेत. २०० रुपये शुल्क होते ते ८० रुपये केले. विमानतळावर पाच मिनिटांऐवजी दहा मिनिटे टॅक्सी व्यावसायिकांना हवी होती, तेही मंजुर केले. गोवा माईल्स रद्द करावी वगैरे मागणी कुणी मान्य करणार नाही. तथापि, आज मी टॅक्सी व्यवसायिकांना बोलावले आहे.

 

Web Title: mopa airport protest cm pramod sawant positive but the local taxi business is aggressive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.