देशात आयुष मंत्रालयातर्फे आणखी 130 इस्पितळे, मंत्री श्रीपाद नाईक यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2017 07:30 PM2017-12-01T19:30:22+5:302017-12-01T19:30:35+5:30
केंद्र सरकारने देशभरात आयुष मंत्रलयातर्फे एकूण 70 इस्पितळे मंजूर करण्यात आली आहेत. यापुढे आणखी 130 इस्पितळे मंजूर केली जातील. एकूण संख्या दोनशे केली जाईल, असे केंद्रीय आयुष मंत्रलयाचे मंत्री श्रीपाद नाईक यांनी शुक्रवारी येथे जाहीर केले.
पणजी : केंद्र सरकारने देशभरात आयुष मंत्रलयातर्फे एकूण 70 इस्पितळे मंजूर करण्यात आली आहेत. यापुढे आणखी 130 इस्पितळे मंजूर केली जातील. एकूण संख्या दोनशे केली जाईल, असे केंद्रीय आयुष मंत्रलयाचे मंत्री श्रीपाद नाईक यांनी शुक्रवारी येथे जाहीर केले.
केंद्रीय मंत्री नाईक शुक्रवारी पणजीतील भाजप कार्यालयात उपस्थित राहिले व त्यांनी गोवाभरातील भाजप कार्यकर्त्यांच्या अपेक्षा व समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना नाईक म्हणाले, की शासकीय पातळीवरून कामे जलदगतीने व्हावीत तसेच नोक-याही उपलब्ध व्हाव्यात, असे कार्यकर्त्यांना वाटते. एरव्ही आपण उत्तर गोव्याचे खासदार या नात्याने उत्तर गोव्यातील लोकांना भेटत होतोच. आता दक्षिण गोव्यातील लोकांनाही भेटण्याची संधी मिळत आहे.
मंत्री नाईक म्हणाले, की उत्तर गोव्यात धारगळ येथे 2 लाख चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा आता आयुष मंत्रालयाच्या ताब्यात येऊ लागली आहे. पूर्वी जी जागा आम्हाला दिली गेली होती, ती प्रत्यक्ष पाहिल्यानंतर योग्य वाटली नाही. त्या जागेत दरी आहे. शिवाय एवढे जंगल आहे की, तिथे जाताही येत नाही. मुख्य रस्त्यापासून ते खूप दूरही आहे. त्यामुळे आम्ही धारगळ येथेच दुस-या ठिकाणी 1 लाख 20 हजार चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा पाहिली. तसेच त्या बाजूची आणखी 80 हजार चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा घेतली. एकूण दोन लाख जागा राज्य सरकारने आम्हाला दिली आहे. अधिकृत प्रक्रिया सुरू आहे. मंत्रिमंडळासमोर येत्या पंधरा दिवसांत हा प्रस्ताव मंजुरीसाठी येईल. अर्थ खात्याकडे फाईल गेली आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी स्वत: या विषयात लक्ष घातले आहे.
मंत्री नाईक म्हणाले, की धारगळ येथे पदव्युत्तर शिक्षणाचे आयुर्वेद महाविद्यालय येईल. हे महाविद्यालय 30 जागांचे असेल. तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा आणि नेचरोपथी ह्या संस्था उभ्या केल्या जातील. संशोधन केंद्र आणि योगाचे केंद्रही उभे केले जाईल. एकूण पाचशे कोटी रुपये खर्चाचा पहिला टप्पा असेल. दुस-या टप्प्यात वसतिगृह आणि अन्य सुविधा मिळून आणखी पाचशे कोटी रुपये खर्च केले जातील. विदेशी पर्यटकांना योगा, नेचरोपथी, आयुर्वेद यांचे मोठे आकर्षण आहे. त्यामुळे गोव्याचे पर्यटन वाढण्यासाठीही धारगळचा प्रकल्प मदतरूप ठरेल.
मंत्री नाईक म्हणाले की, साखळी मतदारसंघातील वेळगे येथे आयुष मंत्रालयातर्फे इस्पितळ बांधले जाईल. त्यासाठी वेळगे येथील कोमुनिदादीची जागा मिळेल. कोमुनिदादीने ना हरकत दाखला दिला आहे. दक्षिण गोव्यात माकाझान येथेही आयुष मंत्रालयातर्फे इस्पितळ बांधले जाईल. दोन्ही इस्पितळांची कामे प्रत्यक्ष राज्य सरकार करून घेणार आहे.