गोव्यात मासळीचे आणखी 94 ट्रक तपासले, फॉरमॅलिनच्या प्रश्नावर एफडीएचे अधिकारी सक्रिय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2018 01:40 PM2018-08-05T13:40:17+5:302018-08-05T13:40:42+5:30
परप्रांतातून गोव्यात आयात होणाऱ्या मासळीची तपासणी अन्न व औषध प्रशासन खात्याकडून चालूच असून आज पहाटे सलग दुसऱ्या दिवशी मासळी घेऊन येणारे 94 ट्रक हद्दीवर तपासले.
पणजी - परप्रांतातून गोव्यात आयात होणाऱ्या मासळीची तपासणी अन्न व औषध प्रशासन खात्याकडून चालूच असून आज पहाटे सलग दुसऱ्या दिवशी मासळी घेऊन येणारे 94 ट्रक हद्दीवर तपासले. ही मासळी दूषित नसल्याचे तपासणीअंती स्पष्ट झाल्याचा दावा खात्याने केला आहे. त्यामुळे ही मासळी आता बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे.
काही दिवसांपूर्वी तामिळनाडू तसेच अन्य राज्यांमधून गोव्यात येणाऱ्या मासळीमध्ये फॉरमॅलिन सापडले त्यामुळे आयातीवर बंदी घातली होती. ही बंदी 3 ऑगस्टपर्यंत लागू होती. शनिवारी बंदी उठल्यानंतर मासळीचे ट्रक तपासण्यात आले. त्यानंतर आज रविवारी सलग दुसऱ्या दिवशी 94 तपासले. पोळें चेक नाक्यावर कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश तसेच अन्य भागातून आलेले ट्रक तपासण्यात आले. तर पत्रादेवी चेकनाक्यावर महाराष्ट्र तसेच उत्तरेकडील अन्य राज्यांमधून आलेले मासळीचे 21 ट्रक तपासले. काल मध्यरात्रीपासून पहाटे ५ वाजेपर्यंत ही तपासणी चालू होती.
अन्न व औषध प्रशासन खात्याच्या संचालिका ज्योती सरदेसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार खात्याचे अधिकारी हद्दीवर तैनात असतात. मासळी टिकविण्यासाठी फॉरमॅलिनचा वापर केला आहे का, त्याची तपासणी विशेष उपकरणाच्या सहाय्याने केली जाते.
दरम्यान, मडगाव येथील घाऊक मासळी बाजारात आता आयात सुरू झाल्याने परप्रांतीय मासळीही येऊ लागली आहे. परंतु गोव्यात मात्र स्थानिक मासळीच्या खरेदीवर भर दिला जात आहे. कुटबण, मालीम, कुठ्ठाळी, वास्को, शापोरा तसेच अन्य जेटींवर ट्रॉलर्स समुद्रात जाऊ लागले असून बांगडे, कोळंबी तसेच अन्य प्रकारची स्थानिक मासळी आता बाजारात उपलब्ध होऊ लागली आहे.
परप्रांतांतून गोव्यात विक्रीसाठी आणली जाणारी मासळी फॉरमॅलिन लावून साठविलेली असते असे उघड झाल्याने काही दिवसांपूर्वी राज्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर सरकारने पंधरा दिवस आयातीवर बंदी घातली होती. फॉरमॅलिन घातक रसायन असून एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर पार्थिव देह टिकून राहावा यासाठी फॉरमॅलिन चा वापर शरीरावर केला जातो. या घातक रसायनामुुळे अनेक रोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे फॉरमॅलिन लावलेले मासे खाणे अत्यंत धोकादायक आहे. सरकारने दिलेल्या निर्देशानुसार कसून तपासणी करीत आहोत प्रसंगी प्रयोगशाळेतही पाठवून देते तपासणी होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
गोव्याचा मासळी हंगाम १ ऑगस्टपासून सुरू होतो. असे असले तरी सध्या खराब हवामानामुळे ट्रॉलर्स समुद्रात जाऊ शकलेले नाहीत तसेच ट्रॉलर्स वर काम करणारे खलाशी हे कर्नाटक, ओडिशा, झारखंड, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या राज्यातील असतात. पावसाळ्यात दोन महिने मासेमारी बंद असते तेव्हा हे कामगार गावी परत जातात. अनेकदा हे कामगार 15 ऑगस्ट नंतरच परत येतात त्यामुळे नारळी पौर्णिमेनंतरच मासेमारी पूर्ण वेगाने सुरू होईल अशी शक्यता मांडवी फिशरमन्स को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे माजी अध्यक्ष सीताकांत परब यांनी लोकमतकडे बोलताना व्यक्त केली.