अर्ध्याहून अधिक फुर्तादोज गेस्ट हाऊस भुईसपाट, सलग दुसऱ्या दिवशी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 06:03 PM2019-05-08T18:03:27+5:302019-05-08T18:03:37+5:30
कोलवा पंचायत क्षेत्रातील सेर्नाभाटी समुद्र किना-यावरील बेकायदा फुर्तादोज गेस्ट हाऊस बुधवारी अर्ध्यापेक्षा अधिक मोडून टाकण्यात आले.
मडगावः राष्ट्रीय हरित लवादाकडून कारवाई हातोडा हाणला गेलेल्या कोलवा पंचायत क्षेत्रातील सेर्नाभाटी समुद्र किना-यावरील बेकायदा फुर्तादोज गेस्ट हाऊस बुधवारी अर्ध्यापेक्षा अधिक मोडून टाकण्यात आले. एकूण पाच जेसीबी मशिने यासाठी वापरण्यात आली होती. आज गुरुवारपर्यंत ही कारवाई पूर्ण होण्याची अपेक्षा दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे. फुर्तादोज गेस्ट हाऊसची बांधकामे पाडण्याचा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने जुलै 2015 मध्ये दिला होता. मात्र हॉटेल मालकाने या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मार्च 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हा आव्हान अर्ज फेटाळून लवादाचा आदेश कायम ठेवला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
सासष्टीचे मामलेदार विमोद दलाल यांच्या देखरेखीखाली बुधवारी ही कारवाई चालू ठेवण्यात आली होती. दलाल यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, या हॉटेलकडून समुद्र किना-यावर अतिक्रमण करून जी भिंत उभारण्यात आली होती ती पाडण्याबरोबरच रेस्टॉरंटचा पुढील भाग आणि दर्शनी भागात उभारलेल्या खोल्या पाडण्याचे काम पूर्ण झाले. मात्र ही बांधकामे तोडल्याने मोठ्या प्रमाणावर मलबा तयार झाल्यामुळे पूर्ण बांधकाम मोडता येणे शक्य झाले नाही. दलाल म्हणाले, आज गुरुवारी आणखी एक मोठी मशिन आणून इमारतीचा मलबा हटविला जाणार आहे. गुरुवारपर्यंत ही कारवाई पूर्ण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
कोलवा सिव्हिक फोरमच्या ज्युडिद आल्मेदा यांनी या हॉटेलच्या विरोधात सुरुवातीला उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. या समुद्र किना-यावर ज्या रेतीच्या टेकड्या होत्या, त्या कापून हे बांधकाम उभे केल्याचा आरोप त्यांनी केला होता. हे बांधकाम 2003 साली उभारण्यात आले होते, तरीही 1991 पूर्वी या जागी बांधकाम अस्तित्वात होते, असा दावा हॉटेल मालकाने केला होता. कोलवा पंचायतीनेही हॉटेल मालकाच्या दाव्याला समर्थन दिले होते. मात्र हे बांधकाम 1991 च्या पूर्वीचे नव्हते हे हरित लवादासमोर पुराव्यानिशी सिद्ध केल्याने शेवटी ते पाडण्याचा आदेश दिला होता.