आणखी राजीनामे शक्य? नीलेश काब्राल यांचा राजीनामा अन् त्याग सत्र सुरुच राहणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 10:04 AM2023-11-27T10:04:17+5:302023-11-27T10:05:44+5:30

लोकसभा येण्यापूर्वी गोव्यात कदाचित आणखी तिघा-चौघा मंत्र्यांना राजीनामे देऊन जागा खाली करावी लागेल. तशी शक्यता आहेच.

more resignations possible and nilesh cabral resignation and goa politics | आणखी राजीनामे शक्य? नीलेश काब्राल यांचा राजीनामा अन् त्याग सत्र सुरुच राहणार!

आणखी राजीनामे शक्य? नीलेश काब्राल यांचा राजीनामा अन् त्याग सत्र सुरुच राहणार!

नीलेश काब्राल यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला यात आता नवे काही राहिलेले नाही. मात्र शनिवारी रात्री प्रथमच काब्राल यांनी भाजपचे कुडचडेतील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक आदींची एकत्रित सभा घेतली. त्या सभेत काब्राल मनापासून व्यक्त झाले. आपण जसा राजीनामा दिला व (कथित) त्याग केला, तसा त्याग आणखीही तिघा चौघांना करावा लागेल असे आपल्याला भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी सांगितले असल्याचे काब्राल त्या सभेत बोलले. हे विधान मोठे आहे. दखल घेण्याजोगे आहे. म्हणजे लोकसभा येण्यापूर्वी गोव्यात कदाचित आणखी तिघा-चौघा मंत्र्यांना राजीनामे देऊन जागा खाली करावी लागेल. तशी शक्यता आहेच.

काँग्रेस पक्षातून आठ आमदार गेल्यावर्षीं भाजपमध्ये आले. त्यापैकी काही जणांना मंत्री करण्याचे कमिटमेंट देण्यात आले आहे, असे बी. एल. संतोष यांनी आपल्याला सांगितले असे विधान काब्राल यांनी केले आहे. दिगंबर कामत यांच्यासोबत सात आमदार होते, आठवा आमदार मिळत नव्हता तेव्हा आलेक्स सिक्वेरा यांना गाठून मंत्रिपदाची ग्वाही देण्यात आली होती. तो शब्द पाळण्यासाठी आता तुम्ही मंत्रिपद सोडा, त्याग करा, असे काब्राल यांना केंद्रीय नेत्यांनी सांगितले. काब्राल यांनी सगळी स्थिती काल कुडचडेतील भाजप कार्यकर्त्यांसमोर मांडली. काब्राल यांच्या वेदनेशी काही कार्यकर्ते व पदाधिकारी सहमत आहेत. शेवटी पक्षाचा आदेश काब्राल यांनी मान्य केला आहे.

आता यापुढील एक दोन महिन्यांत खरोखर दोघा-तिघा मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल की नाही ते पाहावे लागेल. दिगंबर कामत, संकल्प आमोणकर वगैरे बाशिंग बांधून थांबले आहेत. त्यांना मंत्री व्हायचे आहे. परवा आलेक्स सिक्वेरा मंत्री होताच कामत यांनी जाहीरपणे दाखवून दिलेला प्रचंड आनंद पूर्ण गोव्याने पाहिला आहेच. काब्राल यांचा राजीनामा घेणे सोपे जावे म्हणून आणखी तिघांना तरी त्याग करावा लागेल असे भाजप हायकमांडने काब्राल यांना उगाच सांगितले नसावे ना? असा प्रश्न काही पदाधिकाऱ्यांच्या मनात येतो. लहान मुलांना समजविण्यासाठी किंवा राग घालविण्यासाठी पालकांकडून जसे काहीवेळा उगाच काहीतरी सांगून वेळ मारून नेली जाते तसे कदाचित काब्रालविषयी केले गेले असावे, असे काही मंत्र्यांनाही वाटते. मात्र जे आज सुपात आहेत, ते जात्यात येण्यासाठी जास्त वेळ लागत नसतो. देशभरात आज राजकारण तसेच आहे. दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात जिंकण्यासाठी उत्तर गोव्यातील एक- दोन मंत्र्यांना घरी पाठवून त्यांच्या मंत्रिपदाची खुर्ची नव्या आयात आमदारांना दिली जाऊ शकते. येत्या दि. ५ नंतर तर गोव्यात अनेक मंत्र्यांची खाती बदलण्याची शक्यता आहे.

महसूल खाते रोहन खंवटे यांना मिळू शकते. अन्य एका वजनदार मंत्र्याचे एक खाते बदलले जाऊ शकते. खूप गोष्टी घडणार आहेत. प्रशासनाचे खोबरे होत आहे. गव्हर्नन्स मार खात आहे. पण त्याचे कुणाला सोयरसुतक आहे? नीलेश काब्राल हे कार्यक्षममंत्री होते. त्यांची तुलना आलेक्स सिक्वेरा यांच्याशी होतच नाही. काब्राल काल बोलले की राजीनामा देण्यापूर्वी आपण पंतप्रधान मोदी यांनाही दिल्लीत भेटण्याचा खूप प्रयत्न केला; पण ते शक्य झाले नाही. अर्थात मोदी अशावेळी एखाद्या मावळत्या मंत्र्याला भेटण्याचा प्रश्नच येत नाही. दिगंबर कामत वगैरे काँग्रेसमधून फुटले तेव्हा कामत हे पंतप्रधानांनी दिलेल्या एका आश्वासनामुळे काँग्रेसमधून बाहेर आले अशी बातमी सगळीकडे पसरली होती. ते आश्वासन मंत्रिपद किंवा उपमुख्यमंत्रिपद असे तर नव्हे ना या प्रश्नाचे उत्तर कदाचित येत्या डिसेंबरमध्ये मिळेल.

तूर्त काब्राल यांना आपला तथाकथित त्याग कुरवाळत बसावा लागेल. कुडचडेच्या विकासकामांबाबत मुख्यमंत्री सावंत यांचे काब्राल यांना यापुढे सहकार्य मिळण्याची शक्यता वाटत नाही. त्यामागे विविध राजकीय कारणे आहेत. काब्राल यांच्यावर भाजप सोडण्याची वेळ पुढील तीन वर्षांत येऊ शकते. राजकारण सध्या त्याच दिशेने जात आहे.


 

Web Title: more resignations possible and nilesh cabral resignation and goa politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.