मुरगाव नगरपालिकेत नगराध्यक्ष - उपनगराध्यक्ष निवडण्यासाठी भाजपा विरुद्ध भाजपा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 05:00 PM2019-05-04T17:00:15+5:302019-05-04T17:01:20+5:30

भाजपा आमदार आल्मेदा यांचे समर्थक नगरसेवक नंदादीप राऊत नगराध्यक्ष बनणार अशी चर्चा नगरसेवक गटात होत आहे. 

mormugao municipal election - BJP against BJP? | मुरगाव नगरपालिकेत नगराध्यक्ष - उपनगराध्यक्ष निवडण्यासाठी भाजपा विरुद्ध भाजपा?

मुरगाव नगरपालिकेत नगराध्यक्ष - उपनगराध्यक्ष निवडण्यासाठी भाजपा विरुद्ध भाजपा?

googlenewsNext

- पंकज शेट्ये

वास्को: दक्षिण गोव्यातील मुरगाव नगरपालिकेत गोव्याचे नगरविकासमंत्री तसेच भाजपा आमदार मिलिंद नाईक यांचे असलेले समर्थक नगराध्यक्ष क्रितेश गावकर व उपनगराध्यक्ष शशिकांत परब यांच्यावर भाजपा आमदार कार्लुस आल्मेदा यांच्या समर्थक नगरसेवकांनी अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी शुक्रवारी (दि.३) यश प्राप्त केले. या पालिकेतील नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपद खाली झाल्याने ते भरून काढण्यासाठी लवकरच पालिका संचालक बैठक बोलवणार असून मुरगाव नगरपालिकेचा पुढचा नगराध्यक्ष - उपनगराध्यक्ष कोण याबाबत चर्चा सुरु झाली आहे. भाजपा आमदार आल्मेदा यांचे समर्थक नगरसेवक नंदादीप राऊत नगराध्यक्ष बनणार अशी चर्चा नगरसेवक गटात होत आहे. 

शुक्रवारी (दि.३) मुरगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष क्रितेश व उपनगराध्यक्ष शशिकांत यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावाची बैठक घेण्यात आली असता यांच्यावरील ठराव संमत झाला. नगराध्यक्ष क्रितेश व उपनगराध्यक्ष शशिकांत हे दोघे भाजपाचेच नेता असण्याबरोबरच नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांचे समर्थक आहेत. त्यांना या खुर्चीवरून खाली पाडण्याचे काम भाजपाचे आमदार कार्लुस आल्मेदा यांच्या समर्थक नगरसेवकांनी इतर काही नगरसेवकांची मदत घेऊन केल्याने मुरगाव नगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यात सर्व काही ठिक नसल्याची चर्चा सध्या होत आहे. मुरगाव नगरपालिकेतील नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची खुर्ची अविश्वास ठरावानंतर खाली झाल्याने भविष्यात ह्या दोन्ही पदांचा मानकरी कोण बनणार अशा चर्चेला उत धरू लागले आहे. मुरगाव नगरपालिकेतील नगरसेवक तसेच आमदार आल्मेदा यांचे समर्थक नंदादीप राऊत यांना मुरगाव नगरपालिकेचा नवीन नगराध्यक्ष बनण्याचा मान मिळणार अशी चर्चा नगरसेवक गटात सध्या होत असून ह्याच गटातील महिला नगरसेविकाला उपनगराध्यक्ष बनण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जरी नगरसेवक नंदादीप राऊत यांचे नाव नगराध्यक्ष पदासाठी घेण्यात येत असले तरी ज्या पद्धतीने मुरगाव नगरपालिकेत भाजपा विरूद्ध भाजपा राजकारण चाललेले आहे. ते पाहता आमदार आल्मेदा यांच्या समर्थकांना येणारी नगराध्यक्ष - उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक सहज जाणार नसल्याचे दिसून येत आहे.

मुरगाव नगरपालिकेच्या हद्दीत तीन आमदार येत असून तीनही आमदार (मिलिंद नाईक, कार्लुस आल्मेदा व मवीन गुदिन्हो) भाजपाचेच जरी असल्यास मिलिंद व कार्लुस यांच्या समर्थक नगरसेवकात बिघडल्याने एकाच पक्षाचे असताना सुद्धा ते येणा-या नगराध्यक्ष - उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीसाठी (दुस-या नगरसेवकांच्या सहाºयाने) भिडणार असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. अविश्वास ठराव संमत होऊन २४ तास सुद्धा उलटलेले नसून दोन्ही गटातील नगरसेवकांनी आपल्या बाजूतील नगराध्यक्ष - उपनगराध्यक्ष बनवण्याच्या हालचालींना जोर लावण्यास सुरवात केलेली असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून ह्या दोन्ही पदांची निवडणूक अटीतटीची होणार असा अंदाज मोठ्या प्रमाणात व्यक्त करण्यात येत आहे.

मुरगाव नगरपालिकेत एकूण २५ नगरसेवक असून अविश्वास ठराव संमत झाल्यानंतर कार्लुस आल्मेदा समर्थक नगरसेवकांच्या बाजूत एकूण १३ नगरसेवक (इतर नगरसेवकांचा पाठिंबा घेऊन) असल्याने ह्या गटाशी सध्या बहुमत आहे. आल्मेदा समर्थक नगरसेवकांच्या गटात फक्त एकाच मताची सध्या आघाडी दिसून येत असून नगरविकासमंत्री नाईक यांचे समर्थक नगरसेवक नगराध्यक्ष - उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक होण्यापूर्वी ही आघाडी मोडून काढण्यासाठी सर्व प्रकारची पावले उचलणार हे १०० टक्के तेवढेच सत्य आहे. जरी आल्मेदा समर्थक नंदादीप राऊत हे नवीन नगराध्यक्ष बनणार अशी चर्चा सध्या जोरात होत असली तरी त्यांना ही निवडणूक तेवढी सोपी जाणार नसल्याची जाणीव ह्या गटाला असल्याने त्यांनी सुद्धा अन्य नगरसेवकांना आपल्या बाजूत आणण्याचे तेवढेच जोरात प्रयत्न सुरू केलेले असल्याचे सूत्रांनी कळविले.

मुरगाव पालिका हद्दीतील ह्या दोन भाजपा आमदाराच्या समर्थक नगरसेवकात नगराध्यक्ष - उपनगराध्यक्ष पदासाठी सध्या जोरात राजकारण चालेले असून ह्याच पालिका हद्दीतील दाबोळी मतदारसंघाचे आमदार तथा पंचायतमंत्री मवीन गुदिन्हो यांचे समर्थक नगरसेवक नगराध्यक्ष - उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीसाठी कोणाच्या बाजूने राहणार हे तेवढेच महत्वाचे आहे. अविश्वास ठराव संमत झाल्यानंतर आता पालिका संचालक मुरगाव नगरपालिकेचे नवीन नगराध्यक्ष - उपनगराध्यक्ष निवडण्यासाठी कधी बैठक बोलवणार याच्यावर सर्वांचे लक्ष वेधून राहीलेले आहे. सध्याच्या पालिका राजकारणानुसार आल्मेदा समर्थक नगरसेवक नंदादीप राऊत नगराध्यक्ष व ह्याच गटातील महिला नगरसेविका उपनगराध्यक्ष बनणार अशी चर्चा होत असली तरी निकाल जाहीर होईपर्यंत खरे काय ते स्पष्ट होणार नाही हे तेवढेच खरे आहे.

मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केली होती
मुरगावच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षावर दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव संमत न व्हावा यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मध्यस्थी करून कार्लुस आल्मेदा यांच्या समर्थकांशी याबाबत विनंती केली होती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी विनंती करून सुद्धा त्यांचे न ऐकता नगराध्यक्ष क्रितेश गावकर व उपनगराध्यक्ष शशिकांत परब यांच्यावर अविश्वास ठराव संमत करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या मागणीला न ऐकता अविश्वास ठराव संमत करण्यात आल्याने कदाचित येणा-या नगराध्यक्ष - उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीसाठी कार्लुस समर्थक नगरसेवकांना याचा राजकीय दृष्ट्या दुशपरिणाम सोसावा लागू शकतो अशी चर्चा अनेकात होत आहे.

Web Title: mormugao municipal election - BJP against BJP?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा