मुलाचे नाक-तोंड दाबल्याची मातेची कबुली; मात्र खुनाचा इन्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2024 08:49 AM2024-01-11T08:49:25+5:302024-01-11T08:51:07+5:30
मुलागा चिन्मयचा फोनवर आवाज येऊ नये म्हणून तोंडावर ठेवली उशी.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मुलाच्या खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली एआय कंपनीची सीईओ सूचना सेठ हिने पोलिस तपासात आपण मुलाचे तोंड व नाक उशीने दाबल्याचे मान्य केले आहे. मात्र, त्याचा खून आपणच केल्याचा नकार दिला आहे.
गोव्यात फिरायला आलेली सूचना सिकेरी येथील हॉटेलच्या खोली क्रमांक ४०४ मध्ये थांबली होती, मुलाची वडिलांशी जवळीक असल्यामुळे मुलाशी बोलण्यासाठी व्यंकटरमण है सूचनाला वारंवार कॉल करायचे व त्याच्याशी बोलण्याचा आग्रह धरायचे. ६ जानेवारीच्या रात्री तिला पती व्यंकटरमण यांचा व्हिडिओ कॉल आला. त्यावेळीही त्यांनी मुलाशी बोलायचे असल्याचे सांगितले, परंतु, तिने मुलगा झोपल्याचे सांगितले.
त्याचवेळी व्यंकटरमण यांना मुलाचा आवाज आला, त्यांनी तो जागा असल्याचे सांगत फोन देण्याचा हट्ट धरला, त्यावेळी सूचनाने शेजारी असलेली उशी मुलाच्या तोंडावर ठेवून ती दाबून धरली, फोन डिस्कनेक्ट केल्यानंतर तिने उशी काढली, त्यावेळी आपल्या चार वर्षाच्या मुलाचा गुदमरून मृत्यु झाल्याचे दिसल्याची माहिती तिने पोलिसांना दिली. पोलिसांच्या प्रश्नांना उडवाउडवीची उत्तरे, खोली क्रमांक ४०४ मधील थरार उलगडतोय.
सहा दिवसांचा रिमांड दिल्यानंतर पोलिसांकडून तिची चौकशी सुरु करण्यात आली. सूचनाची मंगळवारी उलट तपासणी केली असता नवऱ्याबद्दल तिच्या मनात असलेला राग स्पष्टपणे जाणवत होता. कोणत्याही परिस्थिती मुलाची भेट होऊ द्यायची नाही, याच हेतूने गोव्यात आली होती, असे प्राथमिक तपासात आढळून आलं आहे. मात्र, तो अजूनही ती तपासासाठी सहकार्य करत नसल्याची माहितीही पोलिसांनी दिली. तपासणीसाठी तिला गोमेकॉत नेण्यात आले होते. तिथे तिच्या काही चाचण्याही करण्यात आल्या. त्यानंतर तेथून मानसोपचार रुग्णालयात नेण्यात आले.
वडील चिन्मयची वाट पाहत होते...
मुलाच्या ताब्यासंदर्भात सूचना व पती व्यंकटरमण यांच्यात कायदेशीर लढाई सुरू आहे. ७ रोजी चिन्मयला भेटण्यासाठी व्यंकटरमण यांना परवानगी मिळाली होती, त्यानुसार, ६ रोजी सूचनाला मेसेज करून बंगळुरुमध्ये मुलास भेटू देण्याचे सांगितले. त्यानुसार व्यंकटरमण बंगळुरुमध्ये वाट पाहत असतानाच गोव्यात आईनेच त्याचा खून केला.
पुरावे वेगळेच सांगतात...
आपल्याला मुलाला मारायचे नव्हते. त्याने बोलू नये म्हणून तोंडावर उशी धरल्याने त्याचा मृत्यू झाला, असे जरी सूचना सांगत असली, तरी फॉरेन्सिक अहवाल वेगळेच सांगत आहे. मुलाचा गळा आवळल्याचे फॉरेन्सिक अहवालात म्हटले आहे. त्यामुळे नाक-तोड दाबल्यामुळे मृत्यू झाला, हा तिचा दावा संशयास्पद ठरत आहे, या प्रकरणात पोलिस आणखी पुरावे जमवीत असून रक्ताच्या सर्व नमुन्यांचे अहवाल मिळाल्यानंतर चिंत आणखी स्पष्ट
होणार आहे.