स्फोटात आई आणि गर्भवती मुलीचा जागीच अंत
By पंकज शेट्ये | Published: November 18, 2023 02:46 PM2023-11-18T14:46:06+5:302023-11-18T14:46:17+5:30
वास्को पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार शनिवारी सकाळी ९ वाजता तो स्फोट झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वास्को: शनिवारी (दि.१८) सकाळी नवेवाडे येथील एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये घरगुती गॅस सिलिंण्डर मधून गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटात दोघा महीलांचा जागीच अंत झाला. गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटात मरण पावलेली शिवानी अनुरागसिंग राजावत नामक महीला साडेचार महीन्याची गर्भवती असून तिच्याबरोबर तिची आई जयदेवी चव्हाण हीचा स्फोटात मृत्यू झाला.
वास्को पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार शनिवारी सकाळी ९ वाजता तो स्फोट झाला. नवेवाडे जय संतोषी माता मंदिरामागे असलेल्या नील पार्वती इमारतीच्या पहील्या मजल्यावर शिवानी राजावत ही २६ वर्षीय महीला तिचे पती आणि आई सोबत राहायची. शिवानी साडेचार महीन्याची गर्भवती होती अशी माहीती पोलीसांकडून प्राप्त झाली. शिवानीचे पती अनुराग राजावत नौदलात कामाला असून शुक्रवारी रात्री ते कामावर गेले होते. शनिवारी सकाळी ९ वाजता शिवानी राहत असलेल्या फ्लॅटमधून भयंकर स्फोटाचा आवाज येताच शेजाऱ्यांनी तेथे धाव घेतली. तसेच घटनेची माहीती पोलीस आणि अग्निशामक दलाला मिळताच त्यांनी तेथे धाव घेतली. घटनास्थळावर पोलीस पोचले असता तेथे साडेचार महीन्याची गर्भवती शिवानी आणि तिची आई जयदेवी मृतअवस्थेत पडल्याचे त्यांना दिसून आले. पोलीसांनी तपासणीला सुरवात केली असता घरातील स्वयंपाक घर, बेडरुम आणि हॉलमधील खिडकीच्या काचा फुटल्याचे त्यांना आढळून आले. ज्यावेळी स्फोट झाला असावा त्यावेळी घराच्या सर्व खिडक्या बंद असाव्या असा संशय पोलीस व्यक्त करित आहेत. घरात असलेल्या गॅस सिलिंण्डरमधून गॅस गळती होऊन नंतर स्फोट झाल्याचे त्यांना चौकशीत जाणवले. स्वयंपाक खोलीत दुधाची पिशवी आणून ठेवल्याचे पोलीसांना घटनास्थळावर तपासणीत दिसून आले. तसेच तेथे गॅस पेटवण्यासाठी वापरण्यात येणारा ‘लाईटर’ पोलीसांना आढळला.
कदाचीत शिवानीची आई स्वयंपाक खोलीत दूध गरम करण्यासाठी गेली असता तिने गॅस पेटवण्याकरिता चालू केला असावा असा संशय पोलीस व्यक्त करित आहेत. त्यानंतर घरात दूध नसल्याचे तिला जाणवल्याने ती बाहेर दुकानात जाऊन दुधाची पिशवी घेऊन आली असावी. दुधाची पिशवी आणण्यासाठी गेली असता ती गॅस बंद करायला विसरली असावी अन् त्याचवेळी गॅस गळती होऊन गॅस सर्वत्र पसरला असावा. दुध घेऊन आल्यानंतर ते गरम करण्यासाठी जयदेवी हीने गॅस पेटवण्याकरिता लाईटरचा वापर केला असावा अन् त्यामुळेच स्फोट झाला असावा असा संशय सद्या पोलीस व्यक्त करित आहेत. वास्को पोलीसांनी घटनास्थळावर पंचनामा करून मरण पावलेल्या शिवानी आणि जयदेवी यांचा मृतदेह चिखली उपजिल्हा इस्पितळात पाठवून दिला. तेथे त्यांच्या मृतदेहावर पंचनामा केल्यानंतर शवचिकीत्सेसाठी त्यांचा मृतदेह मडगावच्या जिल्हा इस्पितळात पाठवल्याची माहीती पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील नाईक यांनी दिली.
शिवानीचा पती सकाळी कामावरून परतण्यापूर्वीच ती घटना घडली. तो कामावरून परतला असता त्यांने त्याची गर्भवती पत्नी आणि सासू मृतअवस्थेत पडल्याचे पाहील्यानंतर त्याला मोठा धक्का बसल्याचे पोलीसांनी सांगितले. शिवानी, त्याचा पती आणि आई ह्याच वर्षी नवेवाडे येथील त्या फ्लॅटमध्ये रहायला आले होते अशी माहीती पोलीसांनी दिली. मरण पावलेली शिवानी आणि तिची आई जयदेवी ग्वाल्हेर, मध्यप्रदेश येथील असल्याची माहीती पोलीसांनी दिली. वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक कपील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली त्या प्रकरणाचा अधिक तपास चालू आहे.