गोव्यात विशेष उपचारांसाठी माता-मुल विभाग सुरू होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 01:47 PM2018-09-27T13:47:22+5:302018-09-27T13:47:47+5:30
आशिया खंडातील सर्वात मोठे इस्पितळ असलेल्या गोव्यातील बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळात (गोमेकॉ) माता-मुले असा स्वतंत्र विभाग सुरू केला जाणार आहे.
पणजी : आशिया खंडातील सर्वात मोठे इस्पितळ असलेल्या गोव्यातील बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळात (गोमेकॉ) माता-मुले असा स्वतंत्र विभाग सुरू केला जाणार आहे. केंद्र सरकारने या विभागासाठी 15 कोटी रुपयांचा निधी आरोग्य खात्याला नुकताच दिला आहे. जन्म दिल्यानंतर आईवर आणि जन्मास घातलेल्या मुलावर विशेष उपचार करता यावेत यासाठी हा स्वतंत्र विभाग असेल.
आरोग्य क्षेत्रत गेले वर्षभर विविध प्रकारचे उपक्रम राबविले जात आहेत. गोमेकॉ इस्पितळात अत्याधुनिक सोयीसुविधा असलेला त्वचा विभाग दीड महिन्यापूर्वी सुरू करण्यात आला. बांबोळी इस्पितळासाठी वैद्यकीय कचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनीही बुधवारी या प्रकल्पाला भेट दिली व पाहणी केली. बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळाचा व्याप वाढला आहे. गोव्याच्या शेजारील सिंधुदुर्ग आणि कारवारचेही लोक गोमेकॉमध्ये उपचारांसाठी येत असतात. गोमेकॉ इस्पितळात सुपरस्पेशालिटी विभागाची सोय झाली आहे.
या विभागात हृदयावरील सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यासाठी दरमहा पाच लाख रुपयांच्या वेतनावर तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोफत बायपास व अन्य शस्त्रक्रिया करून मिळत असल्याने समाजाच्या विविध स्तरांतील रुग्ण गोमेकॉमध्ये येतात. सिंधुदुर्ग व कारवापर्यंत अन्य कुठेच अशी सोय असलेले सरकारी इस्पितळ नाही. हे केंद्र सरकारच्या लक्षात आल्यानंतर विविध सुविधा वाढविण्यासाठी केंद्राने मदत देणे सुरू केले आहे. गोमेकॉसाठी विभागीय कॅन्सर सेंटरही केंद्राने मान्य करून त्यासाठी 45 कोटींचा निधी दिला आहे.
गोमेकॉत आता माता-मुल विभाग सुरू होणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी दिली. मंत्री राणे म्हणाले, की मुलांसाठी या विभागात स्वतंत्र अतिदक्षता विभाग असेल. केंद्राने 15 कोटी रुपये दिले तरी, राज्य सरकारही काही प्रमाणात खर्च करणार आहे. केंद्रातील अधिका-यांचे एक पथक दोन दिवसांत गोव्यात येणार आहे. त्यांच्यासमोर या विभागाविषयी सादरीकरण होणार आहे. तसेच साडेतीनशे कोटी रुपयांचा जो सुपरस्पेशालिटी विभाग बांबोळी येथे उभा केला जात आहे, त्याच्या पाहणीसाठीही केंद्रीय पथक येणार आहे. या विभागासाठी 70 कोटींची वैद्यकीय उपकरणो खरेदी करण्याचे कामही केंद्र सरकारच करणार आहे. त्या विभागाविषयीही केंद्रीय पथकाला सादरीकरण केले जाईल. त्यांना डिझाईन थोडे बदलून हवे आहे.