काँग्रेससोबत युतीच्या दिशेने वाटचाल; गोवा फॉरवर्डचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 02:55 PM2021-02-18T14:55:42+5:302021-02-18T14:55:51+5:30

आम्ही लोकेच्छेनुसार काँग्रेससोबत येत्या निवडणुकीवेळी युती करण्याच्याच दिशेने वाटचाल करत आहोत, असे गोवा फॉरवर्ड पक्षाने जाहीर केले.

Moving towards an alliance with the Congress says Goa Forward | काँग्रेससोबत युतीच्या दिशेने वाटचाल; गोवा फॉरवर्डचा दावा

काँग्रेससोबत युतीच्या दिशेने वाटचाल; गोवा फॉरवर्डचा दावा

Next

पणजी : येत्या विधानसभा निवडणुकीवेळी समविचारी पक्षांनी एकत्र यावे असे लोकांना वाटते. आम्ही लोकेच्छेनुसार काँग्रेससोबत येत्या निवडणुकीवेळी युती करण्याच्याच दिशेने वाटचाल करत आहोत, असे गोवा फॉरवर्ड पक्षाने गुरुवारी येथे जाहीर केले.

मडगाव पालिका क्षेत्रात मी, काँग्रेसचे नेते दिगंबर कामत व आमदार आलेक्स रेजिनाल्ड असे तिघेही एकत्र आहोत. बुधवारी रात्री देखील माझी कामत यांच्यासोबत बैठक झाली. आम्ही पालिका निवडणुकीत एकत्र असल्याने अन्य पालिका क्षेत्रांत देखील काँग्रेस किंवा अन्य विरोधकांसोबत आमचे सहकार्य असेल. गोवा फॉरवर्डचे निर्णय हे स्थानिक स्तरावर होतात, काँग्रेसचे निर्णय कुठे होतात ते काँग्रेसने पहावे, मला त्याविषयी तक्रार नाही पण पुढील विधानसभा निवडणुकीवेळी देखील आम्ही एकत्र रहावे अशा पद्धतीने सध्या वाटचाल सुरू आहे, असे सरदेसाई म्हणाले. 

पेडणे पालिकेच्या सर्व दहा प्रभागांमध्ये आम्ही उमेदवार उभे करणार आहोत. म्हापसा पालिका क्षेत्रात मात्र तीनच ठिकाणी आम्ही आमचे उमेदवार उभे करू. भारतीय जनता पक्ष स्वत:च्या निशाणीवर निवडणूक लढविण्याबाबत घाबरला. त्या पक्षाला स्वत:च्या चिन्हावर पालिका निवडणुका नको. कारण पालिका निवडणुकीत आपण पराभूत होणारच हे भाजपला  ठाऊक आहे आणि निवडणूक हरल्यानंतर ती पक्ष चिन्हावर लढवली नाही म्हणून हरलो असे सांगून भाजप मोकळा होईल असे सरदेसाई म्हणाले.

काँग्रेस पक्ष अस्तित्वातच नाही, जे पाच आमदार आहेत ते अपक्ष आहेत असा दावा करणारे प्रतिज्ञापत्र विल्फ्रेड डिसा व क्लाफास डायस या दोन भाजप आमदारांनी न्यायालयाला सादर केले आहे. या प्रतिज्ञापत्राशी मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे सहमत आहेत की नाही हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे. कारण या प्रतिज्ञापत्राचा फार मोठा परिणाम सभागृहातील स्थितीवर होतो. विधानसभेत विरोधी पक्ष कुठचा असा प्रश्न निर्माण होतो, असे सरदेसाई यांनी नमूद केले. मला स्वत:ला विरोधी पक्षनेता होण्याची इच्छा नाही, कारण माझे लक्ष सध्या पूर्णपणे २०२२ सालच्या विधानसभा निवडणुकीवर आहे असेही त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नादाखल सांगितले.

पेडणेचे माजी नगरसेवक प्रशांत गडेकर यांनी गुरुवारी गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेश केला. सरदेसाई, किरण कांदोळकर व विनोद पालयेकर यांनी त्यांचे स्वागत केले. पेडणेच्या आमदाराला यावेळी लोक घरी पाठवतील असे सरदेसाई व गडेकर म्हणाले. येत्या विधानसभा निवडणुकीत दहापैकी एका जरी फुटीर आमदाराला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तिकीट दिले तर आम्ही राष्ट्रवादीसोबत युती करणार नाही, असे कार्याध्यक्ष कांदोळकर यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Moving towards an alliance with the Congress says Goa Forward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.