श्रीपादभाऊ इफेक्ट! आता केंद्रीय निधीतील प्रकल्पांच्या उद्घाटनाला खासदारांना बोलवाच
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 09:01 AM2023-03-25T09:01:48+5:302023-03-25T09:02:19+5:30
गेल्या महिन्यात दोनापावल जेटीचे उद्घाटन करण्यात आले, त्यास श्रीपाद नाईक यांना डावलण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : दोनापावल जेटीच्या उद्घाटनाला निमंत्रण न दिल्याने उत्तर गोव्याचे खासदार तथा केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी काही दिवसांपूर्वी जाहीरपणे संताप व्यक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारला खडबडून जाग आली. काल सर्वसाधारण प्रशासन विभागाने चक्क परिपत्रक जारी करीत यापुढे केंद्राच्या निधीतून होणाऱ्या कोणत्याही प्रकल्पांच्या उद्घाटनाला खासदारांना टाळू नका, असे सक्तीचे निर्देश दिले आहेत.
गेल्या महिन्यात दोनापावल जेटीचे उद्घाटन करण्यात आले, त्यास श्रीपाद नाईक यांना डावलण्यात आले होते. त्यानंतर श्रीपादभाऊंनी तीव्र संताप व्यक्त करीत मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली होती. झालेल्या चुकीबद्दल राज्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनीही लगेच श्रीपाद नाईक यांची जाहीर माफी मागितली होती.
श्रीपादभाऊंना निमंत्रण दिले गेले नाही हा निष्काळजीपणा असल्याचे मान्य करीत खंवटे यांनी माफी मागितली होती. यापुढे अशा प्रकाराची पुनरावृत्ती घडणार नाही, असे खंवटे यांनी म्हटले होते. त्यांनी श्रीपादभाऊंची प्रत्यक्ष भेट घेऊन दिलगिरी व्यक्त केली होती. त्यानंतर आता हे परिपत्रक आले आहे. दरम्यान, राज्याच्या खर्चाने झालेल्या प्रकल्पाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री तसेच संबंधित खात्याच्या मंत्र्याला आमंत्रण देणेही सक्तीचे केले आहे.
सर्वसाधारण प्रशासन विभागाने काढलेल्या परिपत्रकामुळे आता राज्यात सुरू असणाऱ्या विविध प्रकल्पांच्या उद्घाटन कार्यक्रमांना कोणाची उपस्थिती असणार हे निश्चित झाल्यासारखे आहे.
काय होता वाद
केंद्र सरकारकडून मिळालेल्या निधीतून १७ कोटी रुपये खर्च करुन नूतनीकरण केलेल्या दोनापावल जेटीचे सौंदर्यीकरण केलेले आहे. श्रीपाद नाईक यांनी त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करुन स्वदेश दर्शन योजनेखाली निधी आणला होता. केंद्र सरकारकडून निधी मिळतो तेव्हा केंद्राच्या प्रतिनिधीला कार्यक्रमाला बोलावणे अपेक्षित असते.
अर्थसंकल्पाबाबत बैठकीत चर्चा
मुख्यमंत्र्यांनी कोअर कमिटीतील सदस्यांकडून राज्य सरकारच्या आगामी अर्थसंकल्पासाठी त्यांची मते जाणून घेतली. श्रीपाद यांनी या बैठकीत आपली मते मांडताना काही सूचनाही केल्या.
भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत वादळ
भाजप कोअर कमिटिची बैठक काल आल्तिनो येथे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर झाली. या बैठकीस केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक हे उपस्थित होते. या बैठकीत सभापती रमेश तवडकर यांनी ग्रामपंचायतींना निधी मंजूर करण्यासाठी काहीजण पैसे घेतात, असा आरोप केला. त्यावर भाजप कोअर टीमच्या अनेक सदस्यांनी या प्रकारांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत, असे प्रकार होत असतील तर संबंधितांवर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी केली. पंचायतमंत्री माविन गुदिन्हो बैठकीला उपस्थित नव्हते. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या विषयात लक्ष घालून माविन यांच्याकडे स्पष्टीकरण विचारावे, असे काही सदस्यांनी बैठकीत सुचविले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"