मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान चीनचे अंकल मीर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 03:50 PM2018-11-24T15:50:36+5:302018-11-24T15:54:33+5:30
मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानला चीनमध्ये अंकल मीर म्हणून ओळखले जात आहे. आमिर खानच्या तीन चित्रपटांमुळे त्याच्या फॅन फॉलोअर्सची कक्षा रुंदावली आहे.
संदीप आडनाईक
पणजी : मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानला चीनमध्ये अंकल मीर म्हणून ओळखले जात आहे. आमिर खानच्या तीन चित्रपटांमुळे त्याच्या फॅन फॉलोअर्सची कक्षा रुंदावली आहे.
गोव्यामध्ये ४९ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू आहे. फिल्म विदाउट बॉर्डर्स या सेशनमध्ये परफेक्शनिस्ट आमिर खान चीनचे अंकल मीर असल्याची माहिती दिग्दर्शक आणि समीक्षक मार्को म्यूलर यांनी दिली. चीनमध्ये भारतीय चित्रपटांनी विशेषत: आमिर खानच्या चित्रपटांना मिळालेल्या यशाबद्दल म्यूलर यांनी या सत्रात माहिती दिली.
पीके या चित्रपटाने सर्वप्रथम चीनमधील प्रेक्षकवर्ग खेचून घेतला. या चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादामुळे त्याने उत्तम व्यवसायही केला. पीकेशिवाय थ्री इडियटस, दंगल आणि आता ठग्स ऑफ हिंदुस्थान या चित्रपटांनी भारतीय चित्रपटांचा खास प्रेक्षकवर्ग चीनमध्ये निर्माण केला आहे. पीके हा चित्रपट त्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला.
चीनमधील प्रेक्षक आणि तेथील मार्केटमध्ये भारतीय चित्रपटांची क्रेझ पूर्वीपासूनच आहे. यानिमित्ताने सिध्द झाले आहे. चीनमधील सुपरस्टार सोडून बाहेरच्या नायकाला तेथील प्रेक्षक पसंत करत आहेत, हा इतर देशांसाठी नव्या अध्याय आहे. त्यामुळे भारतीय चित्रपटांना नवे व्यासपीठ मिळाले आहेच, शिवाय त्यांचा खास असा प्रेक्षकवर्गही निर्माण झालेला आहे.
भारत आणि चीन या दोन देशातील मूल्यांचा चित्रपटांच्या माध्यमातून प्रसार होतो आहे. आमिर खानला प्रेमाने अंकल मीर म्हणणे आणि भारतीय सिनेमांना तेथे प्रतिसाद मिळणे हे चित्रपटाच्या मार्केटिंगसाठी चांगले आहे. यानिमित्ताने भारतीय चित्रपटांच्या कक्षा रुंदावल्या असून कोणत्याही देशाच्या सीमेचे कुंपण भारतीय चित्रपटांसाठी उरलेले नाही, असेही म्यूलर म्हणाले.