मडगावच्या प्रभाग फेररचनेत गोंधळ
By admin | Published: August 23, 2015 02:01 AM2015-08-23T02:01:12+5:302015-08-23T02:01:23+5:30
मडगाव : मडगाव नगरपालिकेची प्रभाग पुनर्रचना गोंधळात टाकणारी आहे. ही प्रक्रिया राबविताना सावळा गोंधळ घातल्याचे एव्हाना स्पष्ट होऊ लागले आहे.
मडगाव : मडगाव नगरपालिकेची प्रभाग पुनर्रचना गोंधळात टाकणारी आहे. ही प्रक्रिया राबविताना सावळा गोंधळ घातल्याचे एव्हाना स्पष्ट होऊ लागले आहे. घिसाडघाईने व केवळ आपल्या मर्जीतील राजकीय असामीचे हित सांभाळण्यासाठी ही कसरत केली असावी असा संशय यावा, असा एकंदर हा मामला दिसून येत आहे. पुनर्रचना करताना सावळा गोंधळ घातल्याचे स्पष्ट झाले असून फेररचना करताना मडगाव नगरपालिकेचा २३वा प्रभाग फातोर्डा व कुडतरी मतदारसंघांत विभागून घालण्याचे दिव्य पालिका संचालनालयाने केले आहे.
प्रभागाची विभागणी करताना सर्व मार्गदर्शक तत्त्वांची पायमल्ली केल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्व प्रभागांत समान मतदारसंख्या करण्याच्या उद्देशाने पालिका प्रभागांची फेररचना करण्यात येत असल्याचे सरकारने जाहीर केले होते. मात्र, पालिकांची पुनर्रचना करताना पालिका प्रभागांच्या भौगोलिक सीमा न पाहता केवळ राजकीय फायद्याचाच विचार केल्याचा आरोप आता विरोधकांकडून व्हायला लागला आहे. प्रभाग क्र. १६ची फेररचना करताना तर कहरच केला असून या प्रभागात चार हजार मतदार आहेत, तर इतर प्रभागांतील मतदारांची संख्या दोन हजार सहाशेच्या आसपास आहे. ही तफावत न समजण्यापलीकडची असल्याचे फातोर्डा मतदारसंघाचे आमदार विजय सरदेसाई यांच्या कार्यालयातून आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
नवीन प्रभाग करताना त्या प्रभागातील विभाग वेगळे करण्यात आलेले आहेत. प्रत्येक प्रभागात वेगवेगळे भाग असतात, हे भाग भौगोलिक सीमा लक्षात घेऊन केलेले असतात. हे भागही नव्या फेररचनेत वेगळे करण्यात आले असल्याचे पाहायला मिळते. काही प्रभागातील मोजक्याच घरांना वेचून वेगळे काढण्यात आलेले असून काही इच्छुकांना साहाय्य करण्यासाठी केलेली ही राजकीय तडजोड असल्याचा सूर आता मडगावात ऐकू येत आहे.
मडगाव मतदारसंघातील भाग ५ मधील मतदारांची नावे कोणत्याच प्रभागात आढळत नाहीत. या मतदारांची नावे प्रभागात समाविष्ट करण्यास फेररचना करणारे विसरले असल्याचे दिसत आहे. फेररचना करताना पालिका प्रशासनाने सर्व मार्गदर्शक तत्त्वे पायदळी तुडवली असून या फेररचनेतून काही उमेदवारांचे हित जपले जात असल्याचे आता मतदारही बोलू लागले आहेत. काही उमेदवारांना आपल्या मतदारांची घरे शोधताना पालिका निवडणुकीच्यावेळी सर्कस करावी लागणार आहे.
दरम्यान, संपूर्ण फेररचनाच गोंधळात टाकणारी असल्याची टीका आमदार विजय सरदेसाई यांच्या कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे.
(प्रतिनिधी)