मल्टीप्लेक्स माफियांचा सिनेउद्योगावर कब्जा, ज्युरी, चेअरमनची इफ्फीत खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 06:34 PM2018-11-21T18:34:22+5:302018-11-21T18:34:44+5:30
मल्टीप्लेक्स माफिया सिने उद्योगावर कब्जा करत आहे. सिने उद्योग ह्या माफियाकडून उध्वस्तच केला जात आहे, अशी खंत इंडियन पॅनोरमा विभागाच्या फिचर फिल्म ज्युरी मंडळाचे चेअरमन राहुल रवैल यांनी व्यक्त केली.
- सदगुरू पाटील
पणजी - मल्टीप्लेक्स माफिया सिने उद्योगावर कब्जा करत आहे. सिने उद्योग ह्या माफियाकडून उध्वस्तच केला जात आहे, अशी खंत इंडियन पॅनोरमा विभागाच्या फिचर फिल्म ज्युरी मंडळाचे चेअरमन राहुल रवैल यांनी व्यक्त केली.
येथे सुरू असलेल्या 49 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) ठिकाणी रवैल यांची अन्य ज्युरी सदस्यांसोबत बुधवारी पत्रकार परिषद झाली. मल्टीप्लेक्सना सिनेमात रस नाही. त्यांना पॉपकॉन्स आणि सामोसा विक्रीतच रस आहे. चांगल्या व दज्रेदार छोटय़ा सिनेमांना व नॉन फिचरना त्यामुळे मल्टीप्लेक्समध्ये स्थानच मिळत नाही. अनेक चांगले सिनेमा लोकांर्पयत पोहचतच नाहीत. त्यांची निर्मिती होते पण ते पाहण्यासाठी जागाच उलबद्ध नाही. मी याविषयी माहिती व प्रसारण मंत्रलयाच्या सचिवांशीही बोलणार आहे. मल्टीप्लेक्समध्ये जाऊन सिनेमा पाहणो हे खूप खर्चिक झालेले आहे, असे रवैल म्हणाले.
भारतीय पॅनोरमा विभागात एकूण 60 टक्के प्रवेशिका ह्या शॉर्ट फिल्म्सच्या आल्या होत्या. अतिशय चांगले शॉर्ट फिल्स तयार होत आहेत. यापुढील काळात भारतीय सिनेसृष्टीचा सर्वात मोठा अवकाश शॉर्ट फिल्म्स व्यापतील असा विश्वास नॉन फिचर फिल्म ज्युरी मंडळाचे चेअरमन विनोद गानत्र यांनी व्यक्त केला. एकापेक्षा एक असे अगदी सरस नॉन फिचर व शॉर्ट फिल्स देशात तयार होत आहेत. आम्ही इफ्फीसाठी त्यापैकी अवघेच निवडू शकलो. डिजीटल टेक्नोलॉजीच्या सहज उपलब्धतेमुळे आणि नव्या तंत्रज्ञानामुळे अधिकाधिक निर्माते शॉर्ट फिल्स तयार करण्यासाठी पुढे येत आहेत. यावेळी लडाखहूनही यावेळी शॉर्ट फिल्म तयार होऊन आले. नागालँडमधूनही प्रथमच शॉर्ट फिल्म आले. यापुढे एक काळ असा येईल की, शॉर्ट फिल्सचीच भारतीय सिने सृष्टीच्या अवकाशात मक्तेदारी असेल आणि ते चांगलेही होईल, असे गानत्र यांनी नमूद केले.
190 सिनेमा नाकारले
भारतीय प्रेक्षक आता परिपक्व होत आहे. त्यामुळेच तृतीयपंथीयांवर तसेच समलिंगी संबंध ठेवणा-यांवरही आता सिनेमा तयार होत आहेत. प्रेक्षक ते पाहत असल्याने निर्माते तशा प्रकारचे चित्रपट काढतात, असे ज्युरी मंडळाचे सदस्य के. जी. सुरेश म्हणाले. विविध प्रकारचे एकूण 212 सिनेमा भारतीय पॅनोरमा विभागासाठी आले. आम्हाला अखंडीतपणो हे सगळे सिनेमा पाहून त्यातील 190 सिनेमा नाकारावे लागले, कारण बावीसच सिनेमा निवडण्याची आम्हाला मुभा होती. उत्कृष्ट सिनेमाही फेटाळावे लागतात. इफ्फीसाठी ठराविक सिनेमाच निवडावे लागतात. कोणताच सिनेमा अराष्ट्रीय वगैरे नव्हता. तसा जर कुणाचा दावा असेल तर तो चुकीचा आहे, असे सुरेश व अन्य सदस्य म्हणाले.