मुंबई-गोवा विमानभाडे चौपट वाढले, नाताळ, नववर्षासाठी ओघ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 06:05 PM2018-12-24T18:05:43+5:302018-12-24T18:05:55+5:30
नाताळ, नववर्ष साजरे करण्यासाठी गोव्यात येत असाल तर हवाई प्रवासाकरिता चौपट भाडे मोजावे लागेल.
पणजी : नाताळ, नववर्ष साजरे करण्यासाठी गोव्यात येत असाल तर हवाई प्रवासाकरिता चौपट भाडे मोजावे लागेल. एअरलाइन्स कंपन्यांनी तिकीट दर वाढवले असून सामान्य प्रवाशांना ते परवडणारे नाहीत. खासगी बसगाड्यांचे भाडेही वाढले आहे. इयर एंडसाठी पार्टी डेस्टिनेशन ठरलेल्या गोव्यात पर्यटकांची वर्षअखेरच्या सप्ताहात प्रचंड गर्दी असते आणि त्यासाठी वाट्टेल ते तिकीटभाडे मोजून येथे येणारेही आहेत.
मुंबईहून गोव्यात येण्यासाठी एरव्ही दोन ते अडीच हजार रुपये भाडे असते ते ११ हजार रुपयांवर पोहोचले आहे. १ जानेवारीनंतरच्या सप्ताहात गोव्यातून जाण्यासाठीही तिकीटभाडे वाढलेले आहे. गोवा ते बंगळुरू एरव्ही तिकीट २,३00 रुपयांपर्यंत असते, परंतु २ जानेवारीचे तिकीट ८ हजार रुपये झाले आहे. गोवा ते हैदराबाद तिकीट २२00 रुपयांऐवजी तब्बल ९ हजार रुपयांवर पोहोचले आहे. बसभाडेही प्रचंड वाढले आहे. मुंबई, बंगळुरुकडे जाणाऱ्या-येणा-या एसी वोल्वो बसेसचे भाडे ३000 रुपये ते ३५00 रुपये झालेले आहे. एरव्ही ८00 रुपये तिकीट असायचे. २ जानेवारी रोजी गोवा-मुंबई साध्या लक्झरी बसले तिकीट १,८00 रुपये आहे.
कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या
दरम्यान, नाताळ आणि नववर्षाची गर्दी हेरून कोकण रेल्वेने प्रवाशांकरिता खास गाड्यांची व्यवस्था केली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमळी सुपरफास्ट साप्ताहिक गाडी मुंबईहून नाताळच्या दिवशी आणि नववर्षदिनी मध्यरात्री १२.४५ वाजता सुटणार आहे. करमळीहून परतीच्या प्रवासाकरिता दुपारी २ वाजता ही गाडी निघेल आणि रात्री निघेल. ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिवीम रेल्वे स्थानकांवर ती थांबेल.
२७ डिसेंबर रोजी आणि ३ जानेवारी रोची मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मडगाव विशेष गाडी असले. मुंबईहून सकाळी ११.0५ वाजता ही गाडी सुटेल आणि मडगावला रात्री १२.३५ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासाला दुस-या दिवशी मडगावहून सकाळी ६ वाजता निघून छत्रपती शिवाजी टर्मिनसला सायंकाळी ५.५५ वाजता पोहोचेल.